युती जुळली “मती’ जुळेल काय?

नगर – युती होणार की तुटणार, या संभ्रमात तब्बल साडेचार वर्षे दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी केली. परंतु अचानक युती झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील आता बदलले आहेत. अनेक पहिलवानांना तेल लावले अन्‌ ऐन मैदानात उतरविण्याआधीच त्यांना रिंगणाबाहेर फक्‍त टाळ्या वाजविण्याचे काम ठेवल्याने मतांसाठी मती जुळविण्याचे मोठे आव्हान या दोन्ही पक्षांसमोर आहे. लोकसभेसोबतच विधानसभांचेही जागा वाटप ठरल्यामुळे या दोन्ही पक्षांतील अर्ध्याहून अधिक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या स्वबळाच्या तयारीतील बळच युतीच्या घोषणेने हरवून घेतल्यामुळे लोकसभा अन्‌ विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मतविभाजन टाळण्यासाठी युती झाली खरी. पण आता इच्छुक युतीच्या उमेदवारांचे काम करणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गेली साडेचार वर्षे राज्यपातळीवर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली. मुंबईत जो संघर्ष दिसत होता, तो स्थानिकपातळीवर होता. सरकारमध्ये राहून भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वेळोवळी लक्ष्य करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची तसेच त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी शिवसैनिकांनी सोडली नाही. त्याबरोबर भाजपच्या नेत्यांनी देखील शिवसेनेवर आरोप केले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल स्पर्धा निर्माण झाली होती.

जिल्ह्यात नगर शहर, नगर तालुका, श्रीगोंदे, पारनेर, नेवासे, अकोले, कोपरगाव, जामखेड या तालुक्‍यांमध्ये भाजप व शिवसेनेत जोरदार संघर्ष आहे. येथील नेते व कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कोणीही संधी सोडत नाही. आता दुभंगलेली मने जुळविण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर आहे. लोकसभेला फारसा संघर्ष दिसणार नसला, तरी पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र तो प्रकर्षाने दिसून येण्याची शक्‍यता आहे. त्याचा फायदा कॉंग्रेस आघाडीला होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक पातळीवर झालेल्या आजवरच्या निवडणुका या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढविण्याल्या. त्यात मग जिल्हा परिषद असे, महापालिका की नगरपालिका असो. दोन्ही पक्ष समोरसमोर उभे ठाकले होते. परंतु आता लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांसाठी युती झाली आहे.

आज नेते एका व्यासपीठावर आले असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र वाद धुमसत आहेत. लोकसभेसाठी नगर दक्षिणेत शिवसेनेकडून फारसे कोणी आता इच्छुक नाही. युती झाल्यानंतर या मतदारसंघात निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेले घनश्‍याम शेलार यांनी लगेच शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता इच्छुक कोणीच राहिला नाही. परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघात इच्छुक आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून, विद्यमान खा. सदाशिव लोखंडे हे पुन्हा उमेदवार राहणार असल्याचे पक्षाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुक असलेल्यांचे आता वांदे झाले आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नितीन उदमले हे इच्छुक होते. दोघांकडून भाजप पक्षांतर्गत उमेदवारी मिळविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले होते. परंतु युती झाल्याने आता हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहणार असल्याने या दोघांचा हिरमोड झाला आहे.

लोकसभेसाठी उमेदवारीसाठी दोन्ही पक्षांत फारसा संघर्ष नसला, तरी दुंगलेली मने जुळवून काम करून घेण्याचे आव्हान मात्र आहे. खरा संघर्ष विधानसभेला होण्याची चिन्हे आहे. दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांची भाऊगर्दी राहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींसाठी ही चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे. त्यात नगर शहर, अकोले, पारनेर, कर्जत-जामखेड, कोपरगाव, नेवासा, राहुरी या सात विधानसभा मतदारसंघांत शिवसेना व भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत. युती होणारच नाही, हे गृहीत धरून दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी जोरदार तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली होती. अनेकांनी आतापर्यंत स्वत:च्या प्रचार व प्रसारासाठी पाच-पंचवीस लाख रुपये खर्च देखील केले आहे. परंतु आता युती होऊन विधानसभेसाठी जागा वाटप देखील ठरल्याने आता कोणत्या जागा पक्षाकडे येणार अन्‌ कोणत्या जाणार, हे आता त्याच वेळी ठरले. सध्या तरी इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

सन 2014 पूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेकडे नगर शहर, पारनेर, अकोले, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर हे सात, तर उर्वरित कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, नेवासे, राहुरी, शेवगाव-पाथर्डी हे पाच मतदारसंघ भाजपकडे होते. आता निम्म्या-निम्म्या जागांचे वाटप करण्याचे ठरले आहे. त्यामुळे या मतदारसंघात बदल होण्याची अपेक्षा आहे. अर्थात विद्यमान आमदारांच्या जागांमध्ये बदल होणार नसला, तरी उर्वरित जागांबाबत मात्र चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शहरात खरी कोंडी होणार ती विधानसभेला भाजपकडून विधानसभेसाठी खा. गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे इच्छुक आहे. परंतु ही जागा शिवसेनेकडे असल्याने खा. गांधी यांची अडचण झाली आहे. अकोल्यामध्ये भाजपकडून अशोक भांगरे, जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, तर शिवसेनेकडून मधुकर तळपाडे. पारनेरमध्ये विद्यमान आमदार व उपसभापती विजय औटी हे शिवसेनेचे आहे. अर्थात ही जागा शिवसेना सोडणार नाही, असे असले तरी भाजपकडून विश्‍वनाथ कोरडे इच्छुक आहेत.

कोपरगावमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हेंसह नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेनेचे राजेंद्र झावरे हे इच्छुक आहेत. कर्जत-जामखेड या पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे इच्छुक आहेत. राहुरीमध्ये विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात शिवसेनेचे अनिल कराळे, गोविंद मोकाटे इच्छुक आहे. या इच्छुकांनी जोरदार तयारी केली होती. पण आज युतीमुळे त्यांची समीकरणे बदली आहेत. आता ते पुढे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष आहे.

जिल्ह्यात शिवसेना व भाजपमधील सर्वाधिक वाद हा नगर शहरात आहे. भाजपचे खासदार दिलीप गांधी व शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यात वाद आहेत. महापालिका निवडणुकीनंतर भाजपने राष्ट्रवादीबरोबर अभ्रद युती करून भाजपचा महापौर केला. पण शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. शहरात शिवसेनेचे वर्चस्व आहे. लोकसभेला शिवसेनेची मदत भाजपला लागणार आहे. परंतु भाजपकडून खा. गांधी उमेदवार असतील तर शिवसेना काम करणार नाही, असे यापूर्वीच शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. अर्थात खा. गांधी यांना पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, जामखेड या तालुक्‍यतील शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यामुळे भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेण्यासाठी खा. गांधी यांच्याऐवजी दुसरा उमेदवाराचा पर्याय द्यावा लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)