“केंद्र सरकारला चर्चेच्या फेऱ्यांचा विक्रम करायचा आहे का?”; संजय राऊत यांचा सरकारला टोला

मुंबई : दिल्लीच्या सीमेवर मागच्या जवळपास दोन महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात आतापर्यंत चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. परंतु, यातून कोणताही तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्यास तयार नसल्याने हे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान या आंदोलनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सरकारला चर्चेच्या फेऱ्यांचा विक्रम करायचा आहे का? असा खोचक सवाल केला आहे.

शेतकरी आंदोलनावर आपले मत व्यक्त करत राऊत यांनी सरकारवर सडकुन टीका केली आहे. “सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. सरकारने माघार घ्यावी असे आपलं म्हणणं नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. कारण मागच्या ६० दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहे. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि लाखो शेतकऱ्यांना घरी पाठवावे.

कितीवेळा शेतकऱ्यांशी चर्चा करणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवायचे आहे का? शेतकरी मागे हटणार नाहीत. केंद्र सरकारला चर्चेच्या फेऱ्यांचा विक्रम करायचा आहे का?,” असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. तसंच सीरम इन्स्टीट्युटमध्ये लागलेल्या आगीवर बोलताना हा संवेदनशील विषय असल्याचं सांगत तो कट नसून अपघात असल्याचेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.