पुण्यातून एकही जागा न सोडल्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांत नाराजी
“पुण्यात आमची कुठेही “शाखा’ नाही का?’
“भाजप-शिवसेना युती झाली, जागावाटपही झाले; परंतु पुण्यातील आठपैकी एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. त्यामुळे शहरातील शिवसैनिकांमध्ये नाराजी असून, “इतके वर्षे प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम केले. युती नसताना सर्व शिवसैनिक एकजुटीने लढले’, आज त्याचेच हे फळ का? असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांकडून विचारला जात आहे. शिवसेनेचा एक शाखाप्रमुख शंभरीच्या बरोबर आहे. परंतु, इथं युतीच्या मांडवलीमध्ये “पुण्यात आमची कुठेही “शाखा’ नाही’, अशी म्हणण्याची वेळ आली. शिवसैनिकाला “मन आणि मत’ नाहीच का?’ असा उद्विग्न सवाल शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विचारत आहेत.
2014 मध्ये भाजप-शिवसेना युती ऐनवेळी तुटली. आरोप-प्रत्योरोप झाले. त्यावेळी याच शिवसैनिकांनी विजयासाठी वज्रमुठ बांधून विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवून दिले. मात्र, पुण्यातील आठही मतदारसंघात शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. येथे भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यानंतर पुन्हा युती झाली. दरम्यान, 2012 मध्ये शहर शिवसेनेला चांगले नेतृत्व मिळाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाधानकारक यश मिळाले. परंतु, त्यानंतर शहराला खंबीर नेतृत्व न मिळाल्यामुळे पक्षाची अधोगती झाली. 2017 मधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले असते, परंतु यावेळीही पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसला.
आजही हीच परिस्थिती असून, शहर शिवसैनिकांच्या हक्कासाठी लढणारा नेताच पुण्यात नसल्याचे शिवसैनिकांकडून बोलले जात आहे. संपर्कप्रमुख सोडले, तर पदाधिकाऱ्यांची फळीच नाही आणि जे आहेत त्यांनीही पुण्यातील एकतरी जागा शिवसेनेला मिळविण्यासाठी प्रयत्न केला का? असा प्रश्न शिवसैनिकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे शहरातील शिवसेनेचे भवितव्य काय असेल, शिवसैनिकांची मन आणि मत जाणून घेणारे नवीन नेतृत्व मिळणार का? असा प्रश्न शिवसेनेचे काही कार्यकर्ते विचारत आहेत.
पक्षप्रमुख म्हणतात…
“पुण्यातील आठही जागा भाजपकडे आहेत. त्यातच युती होणार, हे निश्चित झाल्यामुळे पुण्यात किमान दोन जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी अपेक्षा शहर शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी ठाकरे यांनी थेट “कोणत्या कारणासाठी मतदारसंघाची मागणी करू, त्या बदल्यात दुसरीकडची जागा मागितली तर काय?’ असा उलट प्रश्न शिवसैनिकांना करण्यात आला. त्यावेळी सगळे शांत झाले. “मातोश्री’वरून परतल्यानंतर “दोन नाही, तर किमान एक तरी जागा सुटेल अशी आशा शिवसैनिकांना होती.
खडकवासला, हडपसरमध्ये बंडखोरी?
शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपावरून नाराज असलेल्या काही इच्छुकांनी यावेळी मागे फिरायचे नाही, अपक्ष लढायचे असा पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. हडपसर मतदारसंघातून शिवसेनेने नगरसेवक प्रमोद भानगिरे, तर खडकवासलामधून रमेश कोंडे निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. दोघाही उमेदवारांनी अर्ज नेले असून, दोन दिवसांत शक्तीप्रदर्शनासह अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अन्य कोणते इच्छुक बंडखोरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.