मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करताच त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक पाहावयास मिळाला. या पार्श्वभूमीवर पुढच्या आठ दिवसांत ही परीक्षा होणार असून तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे दिले होते. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या दरम्यान विरोधी बाकावरील भाजपानेही ठाकरे सरकारला धारेवर धरलं.
आता भाजपच्या याच टिकेवरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या टीकेवर प्रतिउत्तर देण्यात आले आहे. ‘विरोधी पक्षहो, तेल स्वस्त झाले आहे काय?’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामानाचा अग्रलेख ?
एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा व दुसऱ ् या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे , असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे . एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे . आगीत तेल ओतण्याचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत . पेट्रोल , डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत , पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय ? विरोधी पक्षहो , आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करीत आहे काय ?
राज्य लोकसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता 21 मार्चला होईल. सरकारने तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आनंदी झाले असले तरी याप्रश्नी राजकारण करू पाहणाऱ्यांची थोबाडे आंबट झाली आहेत. ‘एमपीएससी’ परीक्षा 14 मार्चला होणार होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलल्याचे जाहीर होताच पुण्यातील रस्त्यांवर स्पर्धा परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्याच्या इतर भागांतही तुरळक आंदोलने झाली. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधी पक्षनेते करीत होते, पण तेलात भेसळ असल्याने आंदोलन पेटण्याआधीच विझले. सरकारने आता लगेच परीक्षेची नवी तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले आहे. ग्रामीण भागात परीक्षा रद्द होणे म्हणजे किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाच माहीत. या परीक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण कोरोनाचा वाढता संसर्ग असेच आहे. मदत व पुनर्वसन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास कोरोनाच्या स्थितीबाबत पत्र पाठवले. त्यावर आयोगाने सचिव स्तरावर निर्णय घेतला. त्या निर्णयाविरुद्ध उद्रेक झाला तेव्हा ‘आयोग’ आणि सचिव मंडळ पळून गेले व आग विझवायला मंत्र्यांनाच यावे लागले. सचिवांनी घेतलेल्या इतक्या मोठय़ा निर्णयाची माहिती मंत्र्यांना नव्हती. त्यातून गोंधळ निर्माण झाला. त्या गोंधळाचे नेतृत्व विरोधी पक्षाने करण्याचा मोका साधला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन हस्तक्षेप करावा लागला. यावरून सरकारवर शेरे-ताशेरे मारले जात आहेत. या सगळय़ा प्रकरणास जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही महाभागांनी केला
हे दुर्दैवच म्हणावे लागेल. कारण कोरोनाचे असेल किंवा इतर काही, पण एमपीएससीच्या परीक्षा सतत पुढे ढकलल्याने वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणाऱया तरुणांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत असते. आधीच महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातच नोकऱ्यांच्या नावाने ‘ठणठण गोपाळ’ सुरू आहे. पदवीधरांना नोकऱ्या मिळत नसतील तर त्यांनी ‘पकोडे’ तळावेत, हाच रोजगार असल्याची भूमिका पंतप्रधान मोदी आणि अमित शहा मांडत असतात; पण मोदी राज्यात पकोडे तळणाऱ्यांचेसुद्धा वांधेच झाले आहेत. मोदी सरकारची नोटाबंदी, जीएसटीसारखी बेभरवशाची आर्थिक धोरणे व त्यात ‘लॉक डाऊन’चा मारा यामुळे उद्योग-व्यवसायाचे पेकाट साफ मोडून पडले. त्याचा परिणाम असा झाला की, किमान पंधरा कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे.
सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्या होत्या, पण त्या क्षेत्राचा लिलाव करून हे सार्वजनिक उद्योग खासगी लोकांना विकले जात आहेत. बंदरे, विमानतळ, रेल्वे, विमा कंपन्यांत मोठय़ा प्रमाणात नोकऱ्या होत्या व नोकरदार वर्गास स्थैर्यही होते. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे येथेच कोटय़वधी लोकांनी कायमस्वरूपी नोकऱ्या गमावल्या. देशातील वाढत्या बेरोजगारीचे मूळ केंद्र सरकारच्या बिनडोक आर्थिक धोरणात आहे. विरोधी पक्षाने जहाल व्हायला हवे ते या बेरोजगारीच्या मुद्दय़ावर, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विद्यार्थ्यांना जमवून भिकार राजकारण करीत आहे व विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना सरकारविरुद्ध लढायला भाग पाडत आहे. विद्यार्थी व पोलिसांत झगडा लावायचा व आपण मजा बघायची अशी मानसिकता यात दिसते. अशाने सरकार पाडले जाईल या भ्रमात कोणी असेल तर त्यांनी डोळय़ांवर थंड पाणी मारून जागे व्हावे हेच बरे.