कोणी बेड देता का बेड? बाधितांचे नातेवाईक हवालदिल

लोणी काळभोर – हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागातील गावांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या तुलनेत दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे करोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्यावर बेड देता का बेड? अशी आर्त हाक मारण्याची वेळ आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांना अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा पुन्हा एकदा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांसह पत्रकारांच्या माध्यमातून बेडसाठी वशिला लावूनही बेड मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाइकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

करोनाची अतीतीव्र, तीव्र व मध्यम स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजनयुक्त बेडची मागणीही अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यातच एखाद्या रुग्णाला बेड मिळालाच तर, संबंधित रुग्णासाठी रेमडेसिविर या इंजेक्‍शनसाठी नातेवाइकांना रात्री-अपरात्री धावाधाव करावी लागत आहे. पूर्व हवेलीत अतिशय गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रशासन यांनी एकत्र येऊन, नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडवाव्यात अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

पैसे आहेत तरीही…
पूर्व हवेलीमधील अत्यवस्थ रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात पोचली असून, यातील चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णांना ऑक्‍सिजन देण्यात येत आहे. तुलनेने लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे असल्याने घरी विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली, तरी शरिरातील ऑक्‍सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्‍टर देत आहेत.

त्यामुळे रुग्णालयातील बेड भरत आहे. करोना बाधितांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाही. दुसरीकडे ज्या व्यक्तीला करोना झाला अशा व्यक्तीच्या नातेवाइकांना घरीही जाता येत नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांची विदारक अवस्था पहायला मिळत आहे. रुग्णांकडे उपचार करण्यासाठी आवश्‍यक पैसेही उपलब्ध आहेत; मात्र उपचार घेण्यासाठी बेड मिळत नसल्याची खंत नातेवाईक व्यक्त करीत आहेत.

लोक बेफिकीर
लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, थेऊर व कदमवाकवस्ती या पाच प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत मागील चार दिवसांच्या कालावधीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. सरकारकडून नागरिकांना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात संदर्भात वारंवार सूचना देऊनही, नागरिक मात्र करोनाचा व आपला काय संबंध अशा स्थितीत वावरत आहेत.

पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असली तरी, पोलीस आले की नागरिक मास्क लावण्याचे नाटक करत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस आले की मास्क तर पोलीस गेले की मास्क काढून नागरिक दिवसभर फिरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.