कुणी लस घेता का, लस..!

आरोग्य विभागाची विनवणी ; ग्रामीण भागात लसीकरणाला मिळेना प्रतिसाद

भगवंत लोहार
मल्हारपेठ  – सुरुवातीच्या काळात करोना विरोधी लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत होती. वेळ प्रसंगी पोलिसांचीही मदत घ्यावी लागली होती. असे असताना आता प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणाऱ्या लसीचे प्रमाण जास्त असताना लसीकरणाला मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही.

पाटण तालुक्‍यातील ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांना घरोघरी भेट देऊन ‘लस घ्या लस’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. परिणामी 18 वर्षावरील लसीकरण पूर्ण क्षमतेने होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ लागले आहेत.

गेले वर्षभर कारोनाच्या महामारीने जनजीवन चांगलेच विस्कळित झाले आहे. सुरुवातीला करोना संसर्गाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात असल्याने निकट सहवासित असणाऱ्यांची करोना चाचणी सक्तीने केली जात होती. सातारा जिल्ह्यात तर दररोज हजाराच्या पटीत करोना रुग्ण सापडत होते. मृत्यूचे आकडे देखील अंगावर काटे आणणारे होते. त्यामुळे रुग्ण शोधणे, त्यांचा संपर्क शोधणे आणि बाधित सापडनारांना विलगीकरण करणे यावर आरोग्य विभागाने भर दिला होता. सुरुवातीला गृहविलगीकरनात रुग्ण ठेवले जात होते. मात्र त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नसल्याने त्यांचा समाजातील संपर्क कमी होत नव्हता.

परिणामी करोनाचा संसर्ग आटोक्‍यात येत नव्हता. यावर पर्याय म्हणून संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर देण्यात आला. त्याचे चांगले परिणाम देखील दिसले. आता करोनाचा संसर्ग आटोक्‍यात आला असून लसीकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीला शंभर – दोनशे असे लसीचे डोस मिळत होते. त्यावेळी लस घेण्यासाठी मोठी झुंबड उडत होती. प्रत्येक जण आपल्यालाच लस मिळावी यासाठी धडपडत होता. तर बऱ्याच ठिकाणी लसीकरणामध्ये वशिलेबाजी देखील चालली होती. आता मात्र उलट चित्र दिसू लागले आहे.

करोना लसीचे डोस भरपूर प्रमाणात येत असताना त्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याची परिस्थिती आहे. अनेक जणांना वारंवार सूचना देऊन देखील ते लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. कोणी लस घेतली आहे, कोणी लस घेतलेली नाही याची खातरजमा करण्याची वेळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आली असून आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, मदतनीस यांना घरोघरी जाऊन लस घ्या लस अशी विनवणी करावी लागत आहे. त्यामुळे कोविड 19 ची लस घेणे ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून लस घेण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच करोनाला आळा बसेल.

गैरसमज अन्‌ भीती कारणीभूत..
करोना लस घेतल्यानंतर खूप त्रास होतो. ताप येतो, थंडी वाजून येते, अंग दुखते त्यामुळे काही विपरीत परिणाम झाला तर? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असून या गैरसमजातून तसेच भीतीमुळे अनेक जण लस घेताना कचरतात. तर एकमेकांना लस घेतली का? याबाबत विचारपूस केली जाते. एकाने लस घेतली नाही असे सांगितले की दुसराही लस न घेण्याची मानसिकता बनवतो. हा प्रकार ग्रामीण भागात प्रामुख्याने पहायला मिळत आहे. यामुळे तेथे लसीकरणाला खो बसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.