-रस्ते सुरक्षा पोलिसांकडून दंडात्मक कारवाई
-सेवा रस्त्यांवर “पार्किंग’
देहूरोड – बेंगलोर-मुंबई बाह्यवळण महामार्गावरील रावेत, किवळे परिसरात रस्त्याच्या दुतर्फा तसेच सेवा रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या वाहनांवर देहूरोड रस्ते सुरक्षा वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतिश पवार यांनी दिली.
किवळे, रावेत, पुनावळे परिसरात बाह्यवळण महामार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा तसेच सेवा रस्त्यांवर दिवस-रात्रं मालवाहतूक ट्रक तसेच अवैध मद्य विक्री ढाब्यासह, ढाबे, रेस्टॉरंटच्या ग्राहकांची वाहने रस्त्यांवरच उभ्या असतात. या उभ्या वाहनांमुळे वारंवार अपघात घडत आहेत. दहा दिवसांपूर्वी रावेत येथे रस्त्यावर उभ्या मालट्रकला पाठीमागून भरधाव वेगातील कार धडकून झालेल्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. /श अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा तसेच सेवा रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या मालवाहतूक वाहनांसह इतर वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
देहूरोड पोलीस ठाणे, रस्ते सुरक्षा वाहतूक विभागाच्या वतीने बेंगलूर – मुंबई बाह्यवळण महामार्गावर किवळे, रावेत व पुनावळे भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रस्त्यावर उभ्या असणाऱ्या, वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरु केली. रस्ते वाहतूक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार, उपनिरीक्षक किशोर यादव यासह सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्याचे पथकाच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अंतर्गत रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांवरही कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.