मुंबई – गॅंगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ज्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या सापडल्या होत्या. ती कागदपत्रे मिळाल्यावर “ईडी’ने पटेल यांच्याविरोधात चौकशी सुरू केली, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी सांगितले. अंडरवर्ल्ड गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार असलेल्या मिर्चीच्या बेकायदेशीर मालमत्तांच्या चौकशीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पटेल यांना 18 ऑक्टोबरला समन्स बजावले आहे.
“ईडी’कडे पटेल आणि हजारा इक्बाल मेमन (मिर्चीची पत्नी) यांच्या स्वाक्षऱ्या असलेली काही कागदपत्रे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या महान घटनांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यामुळे त्याबाबत राज्याला चिंता करावी लागेल, असे गोयल यांनी येथे पत्रकारांना सांगितले. कोणत्याही कारणाशिवाय कोणताही तपास केला जात नाही. तपास यंत्रणांना काही माहिती मिळाली असावी. आम्ही पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशीच्या बाजूने आहोत, त्यामुळे आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी आणि अमली पदार्थांचा तस्कर इक्बाल मिर्ची यांचे काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये निधन झाले. पटेल, त्यांची पत्नी आणि हजारा मेमन यांच्या रिअल इस्टेट कंपनीत झालेल्या कराराप्रकरणी “ईडी’कडून पटेल यांचा जबाब नोंदवण्याची अपेक्षा आहे.