आयर्लंडच्या माहितीपटांना जागतिक व्यासपीठ आणि दर्जेदार प्रेक्षकवर्ग मिळेल

आयर्लंडच्या उपवाणिज्यदूत ऍलिसन रेईली यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईत फिल्म्स डिव्हिजन येथे सुरु असलेल्या 16व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कंट्री फोकस या विभागात यंदा आयर्लंड देशाची निवड करण्यात आली आहे. या विभागाअंतर्गत, सहा माहितीपट आणि एक अनिमेशन पट दाखवला जाणार आहे, अशी माहिती आयर्लंडच्या उपवाणिज्यदूत ऍलिसन रेईली यांनी दिली. या महोत्सवादरम्यान फिल्म्स डिव्हिजन इथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

आयर्लंडमध्ये फिचर फिल्म्स फारशा तयार होत नाही, त्यापेक्षा माहितीपट आणि लघुपटांवर भर दिला जातो. या माहितीपटांना मिफ्फ च्या माध्यामातून मोठे व्यासपीठ आणि दर्जेदार प्रेक्षकवर्ग मिळाल्यामुळे हे माहितीपट अनेकांपर्यंत पोहचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या महोत्सवात आयर्लंडची कंट्री फोकस विभागात निवड करण्यात आल्यामुळे दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, असेही त्या म्हणाल्या. चित्रपट निर्मितीक्षेत्रात भारतासोबत काम करायला आवडेल असेही त्यांनी सांगितले . एखाद्या भारतीय निर्मात्याला आयर्लंडमध्ये चित्रपट निर्मिती किंवा चित्रीकरण करायचे असल्यास, त्याने वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधावा, त्यांना सर्व मदत केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.

कंट्री फोकस विभागासाठी चित्रपटांची निवड करताना, चित्रपटाची गुणवत्ता आणि विषयातील वैविध्य हे निकष ठेवले होते, असे रेईली यांनी सांगितले. आयर्लंडमध्ये भारतासारखे व्यावसायिक, करमणूकप्रधान चित्रपट फारसे बनत नाहीत, जरा शांत,संयमी प्रकारचे चित्रपट बनवले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.

या महोत्सवात दाखवला जाणारा “ब्रेड विनर’ हा ऍनिमेशनपट जगभरात लोकप्रिय झाला असून प्रसिद्ध अभिनेत्री अँजोलिना जोली यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटाची कथा अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका लहानग्या मुलीची जगण्यासाठीची धडपड वर्णन करणारी कथा आहे. या विभागात, “अटलांटिक’ हा पर्यावरणविषयक माहितीपट दाखवण्यात येणार आहे, ज्यात, पारंपरिक कोळी समुदाय आणि उजोगजगात यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. गाझा हा गॅरी केन यांचा चित्रपट गाझापट्टीतील संघर्ष आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांचे आयुष्य वर्णन करणारा आहे. ‘बिट्विन द लँड अँड सी’ या रॉस व्हाईटेकर यांच्या माहितीपटात आयर्लंडच्या पश्चिम सागर किनाऱ्यावरील सर्फिंग या क्रीडाप्रकारामुळे, एका छोट्या गावात झालेल्या बदलाची कथा सांगण्यात आली आहे. द फारदारेस्ट हा इमार रेनॉल्ड, यांनी दिग्दर्शित केलेला माहितीपट अवकाश तंत्रज्ञान आणि त्याचे अद्भुत जग या विषयावर आहे. द कॅमिनो व्हॉयेज हा छोट्या बोटीवर केलेल्या चितथरारक सागरी सफरीविषयीचा चित्रपट आहे. ‘अ डॉक्टर्स स्वार्ड’ या माहितीपटात दुसऱ्या महायुद्धात बचावलेल्या युवा डॉक्टरची कथा आहे, अशी माहिती रेईली यांनी दिली.

पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक दीपजॉय मामपल्ली यांनी या पत्रकार परिषदेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. हे सर्व चित्रपट फिल्म्स डिव्हिजनच्या थियेटर मध्ये दाखवले जाणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.