16 व्या मिफ मध्ये सादर होणाऱ्या माहितीपट आणि लघुपटांमध्ये विषयांचे वैविध्य

निर्माते दिग्दर्शकांनी मांडली माहितीपटांच्या निर्मितीमागची भूमिका

मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या प्रागंणात सुरु असलेल्या 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विविध विषयांवरील माहितीपट, ॲनिमेशनपट आणि लघुपट दाखवले जात आहेत. सोबतच, मुक्त चर्चा आणि मास्टर्स क्लासेस देखील सुरु आहेत, सर्व उपक्रमांना प्रेक्षकांचा, विशेषतः युवा वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

या महोत्सवादरम्यान, आज ‘ॲट द आल्टर ऑफ इंडियाज फ्रीडम आयएनए व्हेटरन्स ऑफ मलेशिया’ या माहितीपटाच्या दिग्दर्शिका चुडी शिवराम, ‘फ्रॉम डरबन टू टुमारो’ या बहुभाषिक माहितीपटाचे दिग्दर्शक डिलन मोहन ग्रे आणि ‘प्लस मायनस’ या हिंदी लघुपटाच्या दिग्दर्शिका ज्योती कपूर दास यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘ॲट द आल्टर ऑफ इंडियाज फ्रीडम आयएनए व्हेटरन्स ऑफ मलेशिया’ हा चित्रपट, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेदरम्यानच्या सत्यघटनांवर आधारित माहितीपट आहे. चाळीसच्या दशकात जपानने ब्रिटिशांचा पराभव केल्यानंतर नेताजींनी आझाद हिंद फौज उभारून जपानच्या मदतीने भारत स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र लढा देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मलेशियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी विशेषतः कोवळ्या वयातल्या मुलांनी त्यांना उत्सफूर्त प्रतिसाद देत ह्या लढ्यात उतरायचे ठरवले. वास्तविक त्यांनी कधीही भारत देश पहिला नव्हता, मात्र नेताजींच्या शब्दांनी प्रभावित होत या कोवळ्या मुलांनी इंफाळच्या युद्धात आपल्या जीवाची बाजी लावली. त्यात मुलींचे प्रमाणही लक्षणीय होते. त्यांनी कसलीही अपेक्षा न करता, कधीही न पाहिलेल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी या यज्ञात उड्या घेतल्या. मात्र त्यांच्या या विलक्षण साहसाची इतिहासात कुठेही नोंद नाही. आज हे सगळे जण ऐंशीच्या वयात आहेत, त्यांना सुभाषबाबूंचा सहवास लाभला होता. त्यामुळे त्यांचे या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान समोर आणावे या हेतूने, आपण या माहितीपट बनवला आहे, असे चुडी शिवराम यांनी सांगितले. या माहितीपटासाठी बऱ्याच कागदपत्रांचा अभ्यास आणि अनेकांची भेट घेऊन चर्चा करावी लागली, मात्र सगळीकडे उत्तम अनुभव आला असे शिवराम यांनी सांगितले.

ऐतिहासिक काळाविषयीचे सिनेमे, मग ते चित्रपट असो किंवा माहितीपट, बनवताना या इतिहासाविषयी अनभिज्ञ असलेल्या पिढीसमोर केवळ सत्य आणि तथ्यांवर आधारित इतिहास आणण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे सिनेमा बनवताना सत्याचा विपर्यास केला जाऊ नये, असे मत चुडी शिवराम यांनी व्यक्त केले. एखाद्या ठिकाणी व्यावसायिक गरज म्हणून बदल करायचे असतील, तर तशी स्पष्ट सूचना चित्रपटाच्या आधी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

‘फ्रॉम डरबन टू टुमारो’ या बहुभाषिक माहितीपटाचे दिग्दर्शक डिलन मोहन ग्रे यांनी देखील या पत्रकार परिषदेत आपल्या माहितीपटाविषयी सांगितले. या बहुभाषिक चित्रपटात पाच मुख्य पात्र आहेत, त्यापैकी तीन महिला आहेत. पाच वेगवगेळ्या देशातले हे पात्र एकत्र येतात आणि जगातील सार्वजनिक आरोग्याविषयी सखोल चर्चा करतात, अशा संकल्पनेवर हा माहितीपट आधारलेला आहे. सार्वजनिक आरोग्य हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून त्यावर देश-समाजाच्या बंधनापलीकडे जात, परस्पर चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो, असा दृष्टिकोन डेलन यांनी मांडला. जागतिक आरोग्याच्या क्षेत्रात मानवी हक्कांच्या आधारे असे काम करता येईल, यावरही ते आपापली मते मांडतात. यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातले एक पात्र देखील आहे.

‘प्लस-मायनस’ या लघुपटाच्या दिग्दर्शिका ज्योती कपूर दास यांनी सांगितले की आपल्या आत चित्रपट निर्मितीची ओढ असेल तर आपण आपली गोष्ट परिणामकारकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यांच्या ‘प्लस-मायनस’ या लघुपटात, एक अनोळखी स्त्री आणि पुरुष एकमेकांना प्रवासात भेटतात. त्यांच्यातल्या संवादातून जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करण्याचा संदेश प्रेक्षकांना मिळतो. त्यातला पुरुष सैन्याची पार्श्वभूमी असलेला असतो. तो त्या स्त्रीच्या मनात आयुष्यातल्या प्लस म्हणजे सकारात्मक गोष्टी शोधण्याचे कसब रुजवून जातो. कथेचा शेवट प्रेक्षकांना धक्का देणारा आणि त्याचवेळी विचारप्रवृत्त करणारा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.