वैद्यांना शस्त्रक्रिया परवानगीच्या निर्णयाविरोधात आंदोलन
पुणे – आयुर्वेदातील शाल्य आणि शालाक्य पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रियांना परवानगी देणाऱ्या “भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद’ (“सीसीआयएम’, सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन) यांनी काढलेल्या अधिसूचनेविरोधात “इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए)ने देशव्यापी आंदोलनचा निर्णय घेतला आहे. 11 डिसेंबर रोजी अत्यावश्यक नसलेल्या सेवा, कोविड सेवा वगळता अन्य वैद्यकीय सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत बंद राहणार आहेत, अशी माहिती “आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मानद राज्य सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी दिली.
आंदोलनानंतर ही अधिसूचना मागे न घेतल्यास “आयएमए’ (नॅशनल) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून, राज्य, जिल्हा स्तरावरही स्थानिक न्यायालयांमध्ये खटले दाखल केले जाणार आहेत. “सीसीआयएम’ने सर्जिकल प्रक्रियेविषयीची सूचना मागे घ्यावी, “मिक्सोपॅथी’ला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व समित्या बरखास्त करा, अशी मागणी “आयएमए’ने केली आहे.
आयुर्वेदातील शाल्य आणि शालाक्य या पदव्युत्तर उच्चशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना 58 शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण दिल्यानंतरच त्यांना स्वतंत्रपणे शस्त्रक्रिया करता येणार आहेत, असा निर्णय “सीसीआयएम’ने दिलेल्या अधिसूचनेद्वारे जारी केला आहे. या शस्त्रक्रियांना संस्कृतोत्पन्न नवे देऊन “सीसीआयएम’ने या सर्व आयुर्वेदिक शस्त्रक्रिया असल्याचा शोध लावला आहे. याशिवाय भारतातील 95 टक्के आयसीयू आयुर्वेदिक डॉक्टर्स चालवतात, असा चुकीचा समज पसरवल्याचा “आयएमए’चा आरोप आहे.
काय सुरू आणि बंद राहणार
– अत्यावश्यक सेवा, कोविड सेवा सुरू राहणार
– आपत्कालीन सेवा, अपघात, प्रसुतीगृहे, आपत्कालीन शस्त्रक्रिया सुरू राहणार
– आयसीयू, क्रिटिकल केअर सुरू राहणार
– ओपीडी, दवाखाने, क्लिनिक्स, प्लॅन करता येण्याजोग्या आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया स्थगित ठेवणार
ज्युनियर डॉक्टर्सचे 8 डिसेंबरपासून आंदोलन
संपूर्ण राज्यातील 150 सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कार्यरत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या डॉक्टरांची “जेडीएन’ ही “आयएएम’शी संबंधित शाखा आहे. यांच्या व्यतिरिक्त “महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स-मार्ड’ यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला असून, 8 डिसेंबरपासून त्यांचे आंदोलन सुरू राहील.