मंचर (पुणे) – आंबेगाव तालुक्यातील खाजगी डॉक्टरांनी प्रांतअधिकाऱ्यांचा कोविड सेंटरमध्ये काम करण्याचा आदेश धुडकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोविड सेंटरमध्ये काम करण्याची 15 डॉक्टरांनी तयारी दर्शवून शुक्रवार (दि. 4) पर्यंत एकही डॉक्टर कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी हजर नसल्याने प्रांतअधिकारी आता कायद्याचा बडगा उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सद्यःस्थितीत सरकारी डॉक्टरांवर कोविड सेंटरमध्ये काम करताना धावपळ होत आहे. यासाठी खासगी डॉक्टरांनी त्वरीत वैद्यकीय सेवेसाठी धावून यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंचर (ता. आंबेगाव) उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालय येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी, या संदर्भात मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत अवसरी फाटा येथे 15 दिवसांपूर्वी बैठक झाली. यावेळी जिल्हा अधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच प्रांतअधिकारी, तहसीलदार, तालुका गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि काही खाजगी डॉक्टरांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यावेळी खासगी डॉक्टरांनी करोनाचे खासगी हॉस्पिटल उभारावे असे ठरले; परंतु त्याबाबत खासगी डॉक्टरांनी असमर्थता दाखविली. त्यानंतर झालेल्या बैठकीत खासगी डॉक्टरांनी मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालय अवसरी खुर्द येथील कोविड सेंटरमध्ये काम करावे, त्यांना शासन नियमानुसार मानधन देण्यात येईल, याला डॉक्टरांनी मान्यता दिली. त्यानुसार मंचर-जुन्नर विभागाचे प्रांतअधिकाऱ्यांनी 26 ऑगस्ट 2020 ला मंचर उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरसाठी 15 खासगी डॉक्टरांची आणि शासकीय महाविद्यालय कोविड सेंटर अवसरी खुर्द येथे काम करण्यासाठी 8 खाजगी डॉक्टरांची पूर्णवेळ कंत्राटी आदेश दिले.
डॉक्टरांच्या उपस्थितीनंतर त्यांना देय असलेले मानधन “एनआरएचएम’ योजनेच्या मार्गदर्शन सुचनेनुसार देण्यात येणार आहे. आदेश प्राप्त झाल्यापासून दोन दिवसांच्या आत त्यांचे नियुक्तीचे ठिकाण म्हणजेच मंचर उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालय अवसरी खुर्द येथील कोविड सेंटर येथे उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आणि आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती शिक्षेस पात्र असून अपराध केला असे मानण्यात येईल, असे लेखी आदेशात उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी म्हटले आहे.
तालुक्यात करोना रुग्णांची संख्या 1 हजार 328 असून, आतापर्यंत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संकटकाळात खासगी डॉक्टरांनी मानवतेच्या भावनेतून सरकारी आरोग्य सेवेला मदत करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र प्रांतअधिकाऱ्यांच्या आदेशाला संबधित खासगी डॉक्टरांनी हरताळ फासला आहे.