डॉक्टरांच्या “प्रिस्क्रिप्शन’वर ऑनलाइन औषध विक्री कंपन्यांची जाहिरात
पिंपरी – ऑनलाइन औषध विक्रीला फार्मासिस्ट संघटनेकडून विरोध होत असतानाच आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन लेटरवर ऑनलाईन औषध विक्रीची जाहिरातच उमटत असल्यामुळे ऑनलाइन औषध विक्रीला डॉक्टरांची साथ लाभत असल्याचे स्पष्ट होत आहे. डॉक्टरच ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांची जाहिरात करु लागल्याने आता केमिस्ट संघटना आणि डॉक्टर समारो-समोर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भारतात ऑनलाइन औषध विक्रीला केंद्र सरकारने परवानगी दिल्यापासूनच संपूर्ण राज्य आणि देशपातळीवरील फार्मासिस्ट संघटनेकडून ऑनलाईन औषध विक्रीला विरोध सुरु झाला आहे. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात फार्मासिस्ट संघटनेने अनेक आंदोलने आणि मोर्चेही काढले आहेत. या आंदोलनात काही ठिकाणी डॉक्टरांनीही सहभाग नोंदवला होता. मात्र, याचा फारसा परिणाम झाला नव्हता. त्यामुळे, ऑनलाइन बाजारात नागरिकांना सहजतेने औषध उपलब्ध होत आहेत.
केंद्र सरकारची परवानगी असल्याने आता अनेक कंपन्यांनी ऑनलाइन औषध विक्रीच्या बाजारात उडी घेतली. या क्षेत्रात बड्या कंपन्या उतरल्या असून त्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरात करत आहेत. औषधांच्या किंमतीवर थेट सवलत देत आहेत. यामुळे मेडीकल दुकाने चालविणाऱ्यांना त्यांच्यासोबत प्रतिस्पर्धा करणे अशक्य होत आहे.
यामुळे अनेक मेडीकलच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच कोणतीही औषधे नागरिकांपर्यंत सहज पोहचू शकतील व त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो, अशी भीती फार्मासिस्ट संघटनांनी व्यक्त केली आहे. परंतु संघटनांच्या विरोधाचा काही विशेष उपयोग झालेला नाही.
या कंपन्या विविध पद्धतीने आपली जाहिरात करीतच आहे. एका औषध कंपनीने चक्क जाहिरात करण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन लेटरचाच वापर केला आहे. डॉक्टर ज्या प्रिस्क्रिप्शन लेटरवर रुग्णांना औषध लिहून देतात, त्याच्यावरच आता ऑनलाइन कंपन्यांची जाहिरात छापून येऊ लागली आहे. यामुळे डॉक्टरांकडून अशा औषध विक्रीचे समर्थन होत असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे, आता फार्मासिस्ट संघटना कोणता पवित्रा घेतात हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, डॉक्टरांकडून ऑनलाइन औषध विक्रीच्या होत असलेल्या जाहिरातबाजीला फार्मासिस्टांकडून विरोध होत असून हा प्रकार थांबवण्याची मागणी होत आहे.
डॉक्टर असोसिएशनशी करणार चर्चा
ऑनलाइन औषध विक्रीमुळे बंदी असलेल्या गोळ्याही पेशंटला सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. शहरातील काही डॉक्टरांच्या प्रिस्प्रिक्शन लेटरवर ऑनलाइन औषध विक्रीची जाहीरात करण्यात येत आहे. ही बाब शहरातील सर्व डॉक्टर संघटना व असोसिएशनच्या कानावर घालून अशा जाहिराती रोखण्याची मागणी फार्मासिस्ट संघटनेकडून करण्यात येणार आहे.
शहरातील काही डॉक्टरांच्या प्रिस्प्रिक्शन लेटरवर ऑनलाइन औषध विक्रीची जाहीरात होत असल्याची बाब अत्यंत चुकीची आहे. शहरातील केमिस्ट संघटना आणि डॉक्टरांच्या संघटना आजपर्यंत पेशंटच्या हितासाठी कार्य करीत आहेत. मात्र, आता डॉक्टरांकडून ऑनलाइनची जाहिरात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही लवकरच डॉक्टर असोसिएशनसोबत चर्चा करणार असून हा प्रकार थांबविण्याची मागणी करणार आहेत.
– संतोष खिवंसरा, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन