पुणे – मध्यवस्तीतील प्रसिध्द डॉक्टर पतीचा मानसिक, शारीरिक छळ करून 40 लाखांचे दागिने, 25 लाखाची रोकड आणि बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले किंमती ऐवज लांबविल्याप्रकरणात पत्नी, मेहुण्यासह तिघांना सत्र न्यायाधीश व्ही.के.यावलकर यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.
डॉक्टरची पत्नी उज्ज्वला ईश्वरचंद चिल्लाळ, मेहुणे गजानन बाबुराव पारखे आणि नातेवाईक अनिल बंडोपंत चिल्लाळ अशी त्या तिघांची नावे आहेत. तिघांनी ऍड. विजयकुमार ढाकणे, ऍड. राणी व्ही. ढाकणे, ऍड. चेतन आंधळे आणि ऍड. अमोल लगड यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत 68 वर्षीय डॉ. ईश्वरचंद चिल्लाळ (रा. गुरूवार पेठ) यांनी तिघांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने तिघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार खडक पोलिसांनी फसवणूक आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
तिघांनी फिर्यादींच्या कपाटातील दागिने, 25 लाख रुपये रोख चोरून नेले. त्यांचा कोणाशी संपर्क होऊ नये, यासाठी त्यांच्या चार मोबाइलची विल्हेवाट लावली. त्यानंतर एका बॅंकेच्या लॉकरमधील किंमती ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केली. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास अधिकारी बोलावतील, त्यावेळी तपास करण्याच्या अटीवर अंतरिक अटकपूर्व जामीन यापूर्वी न्यायालयाने मंजुर केला होता. मात्र, आता अटकपूर्व जामीन मंजुर केला. गुन्ह्यात तिघांचा सहभाग नसून, ते सराईत गुन्हेगार नाहीत. ते पुण्याचे कायमस्वरूपी रहिवाशी आहेत. मालमत्ता सोडून पळून जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व मंजुर करण्याची मागणी ऍड. विजयकुमार ढाकणे यांनी केली.