कीटकजन्य आजारांसाठी पोषक वातावरण असल्याने रुग्णांमध्ये वाढ
पिंपरी – सध्या पावसाळा सुरू असल्याने कीटकजन्य आजारांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या दिवसात चिकनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारांमध्ये वाढ होत असल्याने या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) येथील चाणक्य सभागृहात खासगी डॉक्टरांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे, किटकशास्त्रज्ञ महेंद्र जगताप, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. विजया आंबेडकर उपस्थित होते.
डॉ. आवटे म्हणाले, सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने तत्काळ रुग्णालयात उपचार घ्यावेत. त्यांनी जनसंपर्क टाळावा, शिंकताना किंवा खोकताना नाक-तोंडावर रुमाल धरावा. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांशिवाय इतर औषधे घेऊ नये. गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे यासारखे घरगुती उपाय करावेत. घरातील टेबल, टी-पॉय, संगणकाचा की बोर्ड या सारखे पृष्ठभाग वारंवार साफ करावेत. साध्या साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. शारिरीक, मानसिक ताण टाळावा. पुरेशी विश्रांती घ्यावी. आरोग्यदायी आहार घ्यावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या “सी’ व “ई’ व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
महेंद्र जगताप म्हणाले, अळी प्रतिंबंधक उपाययोजनेअंतर्गत स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडावेत. परिसरातील घरांचे कंटेनर, टायर, कुंड्या यांची वारंवार तपासणी करावी. यामध्ये, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. संशयित रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील घरात औषध व धुरफवारणी करावी. कार्यशाळेस शहरातील खासगी रुग्णालयातील फिजिशियन उपस्थित होते. डॉ. विजया आंबेडकर यांनी आभार मानले.