बीडमध्ये डाॅक्टरच्या रूपात सैतान? काडीपेटी शोधेपर्यंत पळ काढल्याने वाचला आईसह चिमुकलीचा जीव

बीड – तुला मुलीच होतात मुलगा का होत नाही म्हणून बीड जिल्ह्यात पेशाने डाॅक्टर असलेल्या पतीने 4 महिन्याच्या चिमुकलीसह पत्नीच्या अंगावर राॅकेल ओतून जिवंत पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील सारूळ येथे घडली आहे. काडीपेटी भिजली होती, दुसरी काडीपेटी शोधेपर्यंत महिलेने पळ काढल्याने चिमुकलीसह पीडितेचा जीव वाचला.

प्रियंका ढाकणे (रा. सारोळा, ता. केज) असे पीडितेचे नाव असून पाच वर्षापुर्वी त्यांचा विशाल प्रल्हाद घुगे (कळंब) याच्याशी विवाह झाला होता. त्यांना पहिल्यांदा मुलगी झाली. त्यामुळे प्रियंका यांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. मात्र, पुन्हा गरोदर राहिल्यानंतर आता तरी मुलगा होईल असी अपेक्षा होती. मात्र, पुन्हाही त्यांना मुलगीच झाली.

पाच महिन्यांपूर्वी पुन्हा मुलगी झाल्याने तेव्हापासून त्यांना पती आणि सासरच्या मंडळींकडून तुला मुलगा का होत नाही म्हणून मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता, असे पीडिता प्रियंका यांनी सांगितले आहे.

रात्री भांडण झाले आणि नवऱ्याने मला मारहाण केली. नंतर माझ्या व मुलीच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काडेपेटी भिजल्याने दुसरी शोधेपर्यंत मी पळ काढला. म्हणून जीव वाचला असेही प्रियंका यांनी सांगितले. याप्रकरणी पीडित प्रियंका घुगे यांच्या तक्रारीवरून पती डाॅ. विशाल घुगे विरोधात कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.