सातारा : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण मच्छिंद्रनाथ जाधव मद्यधुंद अवस्थेत आढळल्यामुळे रुग्णांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला गेला. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी डॉ. जाधव यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले. तसेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालय अद्ययावत असून याठिकाणी प्रसूतीगृह, एक्स रे मशीन, पॅथॉलॉजी लॅब यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. दिवसभरात १०० हून अधिक रुग्ण याठिकाणी उपचारांसाठी येतात. वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. अरुण जाधव यांची नियुक्ती दीड वर्षांपूर्वी झाली आहे. ते कायमच नशेत असल्याचे बोलले जाते. सप्टेंबर २०२३ मध्ये डॉ. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, एक वर्षांनंतर ते पुन्हा कामावर रुजू झाले. डॉ. जाधव बुधवार दि. ४ रोजी पुन्हा रात्रपाळीसाठी मद्यधुंद अवस्थेत कामावर आले होते. याबाबत सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली.
डॉक्टरच मद्यधुंद अस्वस्थेत असल्याने नागरिक व नातेवाइक संतप्त झाले. याबाबत माहिती होताच व वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी घटनेची शहानिशा करत त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवले. तसेच त्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव तयार करून तो पुण्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे डॉ. पवार आता काय कारवाई करणार याकडे कोरेगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.