छावा संघटनेचे अनोखे आंदोलन : प्रवेशद्वारासमोर लावला फलक
विश्रांतवाडी – कळस येथील जाधववस्तीमधील महापालिकेच्या कै. गेनबा तुकाराम म्हस्के दवाखान्यात बऱ्याचदा डॉक्टरच उपस्थित नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होते. याच्या निषेधार्थ छावा संघटनेने दवाखान्यासमोर “डॉक्टर हरवले आहे’ अशा आशायाचा फलक लावून तसेच डॉक्टर शोधून देणाऱ्यास 501 रुपये रोख रकमेचे बक्षीसही देण्याचे जाहीर केले आहे. छावा संघटनेच्या अनोख्या आंदोलानाची चर्चा कळस परिसरात रंगली आहे.
या दवाखान्यामुळे कळस परिसरातील सर्वसामान्य व गोरगरिबांना कमी खर्चात वैद्यकीय सुविधा मिळतात;परंतु मागील अनेक दिवसांपासून येथे बऱ्याचदा डॉक्टरच उपस्थित नसल्याचे पहावयास मिळत आहे. जर डॉक्टर दवाखान्यात आलेच तर आठवड्यात एकदा-दोनदाच हजर असतात. या दवाखान्यात रुग्णांना वेळेवर औषधेही दिली जात नाहीत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुगणांचे हाल होत आहेत, असा आरोप छावा संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख द्वारकेश जाधव यांनी केला. याबाबत तत्काळ योग्य दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी सांगितले.
डॉक्टर, कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी
कळस दवाखान्यात डॉक्टर व पुरेसे कर्मचारी कायमस्वरूपी नेमून गैरसोय दूर करावी, अशी मागणी द्वारकेश जाधव केली आहे.