करोना चाचण्या करणारे डॉक्टर-टेक्निशयनच बाधित, तरीही….

ससूनसह राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेतही तीच स्थिती

पुणे : ससून रुग्णालयातील करोना चाचणी प्रयोगशाळेत काम करणाऱ्या तब्बल नऊ डॉक्टरांना करोनाची बाधा झाल्याचा खळबळजनक फ्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील अहवालांना विलंब होत असल्याची बाब समोर येत आहे. अशीच स्थिती राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन संस्थेत असल्याचे समजते. मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती संबंधितांकडून समजू शकली नाही. मात्र, एकेक सहकारी बाधित होत असतानाही 24 तास ही प्रयोगशाळा सुरू ठेऊन चाचण्यांचा अहवाल वेळेत देण्याची धडपड सुरू आहे.

करोना संशयितांचे स्वॅब सुरवातीला एनआयव्हीकडे पाठवत. मात्र, साथ वाढल्यावर बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रूग्णालय यांना नमुने चाचणीला परवानगी दिली. त्यानंतर काही खासगी प्रयोगशाळांमध्येही चाचणी होत आहे. एखादा टेक्निशयन किंवा डॉक्टर बाधित झाल्यावर त्या काही दिवस बंद ठेवल्या जात होत्या. त्यामुळे शासकीय यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढला.

ससून रूग्णालयात सुरवातील दररोज शंभर ते दोन नमुने तपासणी केले जात होते. मात्र, जिल्ह्यात प्रादुर्भाव वेगाने वाढल्यानंतर अहवाल तात्काळ मिळावे यासाठी 24 तास काम सुरू ठेवण्यात आले. त्यासाठी अद्ययावत टेक्नॉलॉजीचे मशीन घेण्यात आले. तब्बल दिवसाला एक हजार ते बाराशेपर्यंत नमुने तपासणी अहवाल दिले आहेत. परंतू, आता या प्रयोगशाळेतील काही डॉक्टर बाधित आल्यामुळे मनुष्यबळ कमी झाले आहे. प्रयोगशाळा बंद न ठेवता, दररोज सातशे ते आठ नमुने तपासणी अहवाल दिले जात असल्याचे ससून रूग्णालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ससून रूग्णालय म्हणजे अपुरे मनुष्यबळ. 24 तास सेवा देणारे रूग्णालय. सध्या प्रयोगशाळेत नमुने तपासणीबरोबरच रूग्णालयात ड्युटी करणे, रूग्णांना उपचार देणे अशी अनेक जबाबदाऱ्या डॉक्टर सांभाळतात त्यामुळे यातील 9 डॉक्टर बाधित झाले. प्रयोगशाळेत सध्या 5 डॉक्टर, 5 अधिकारी आणि 6 टेक्निशियन काम करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.