डॉक्‍टर प्रशिक्षणासाठी ओपीडीला “टाळे’

आरोग्य विभागाच्या मनमानी कारभाराचा रुग्णांना त्रास

महागड्या दवाखान्यांचा घ्यावा लागला आधार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – महापालिका रुग्णालयातील डॉक्‍टरांना राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचे प्रशिक्षण द्यायचे असल्याने आरोग्य विभागाकडून बुधवारी महापालिकेचे 40 दवाखाने बंद ठेवण्यात आले. त्यामुळे नागरिकांना अचानक ओपीडी बंद असल्याने खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे महापालिकेकडून सार्वजनिक आरोग्यसेवा किती गांभीर्याने पाहिले जाते याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. दरम्यान, या ओपीडी बंद केल्यानंतर नागरिकांनी पालिकेच्या कोणत्या पर्यायी दवाखान्यांमध्ये जावे याबाबत कोणतीही सूचना अथवा माहिती देण्यासही या ओपीडींमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली.

शहरात महापालिकेचे 57 दवाखाने आणि क्‍लिनिक आहेत. शहरात आरोग्य सेवा पुरविणे हे महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे आरोग्य सेवा महापालिकेस बंद ठेवता येत नाही. मात्र असे असतानाही पालिकेकडून शहराच्या वेगवेगळ्या भागातील 40 ओपीडी बंद ठेवल्या होत्या. त्याची कोणतीही माहिती अथवा पूर्वकल्पना नागरिकांना देण्यात आली नव्हती. काही ठिकाणी ओपीडी बंद असल्याचे बोर्ड लावण्यात आले होते; तर काही ठिकाणी थेट टाळेच लावण्यात आले होते. शहरातील खासगी रुग्णालयाचे महागडे उपचार नागरिकांना परवडत नसल्याने नागरिक पालिकेच्या दवाखान्यामध्ये उपचार घेतात. त्यातच शहरात पावसाळ्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया तसेच प्रदूषित पाण्यामुळे काही साथीच्या आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत. असे असताना अचानक ओपीडी बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. दरम्यान, याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडे माहिती घेतली असता, सर्व डॉक्‍टरांसाठी एका दिवसाचे रुबेला लासिकरन प्रशिक्षण असल्याने या ओपीडी बंद असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

नागरिकांना त्रास झाला तरी चालेल डॉक्‍टरांना नको

वास्तविक पाहता, महापालिकेची आरोग्य सेवा बंद ठेऊन अशा प्रकारे प्रशिक्षण देणे योग्य आहे का? अशी विचारणा केली असता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीच उत्तर देता आले नाही. हे प्रशिक्षण महापालिकेला रविवारी अथवा इतर सुट्टीच्या दिवशी अथवा डॉक्‍टरांच्या बॅच करून देणे शक्‍य होते. मात्र, प्रशिक्षणाचा उपद्‌व्याप टाळण्यासाठी आरोग्य विभागाने एकाच दिवशी हे प्रशिक्षण आयोजित केल्याचे दिसून आले. तर डॉक्‍टरांना सुट्टीच्या दिवशीही प्रशिक्षणास ते तयार होत नाहीत. त्यामुळे डॉक्‍टरांना त्रास नको म्हणून नागरिकांची गैरसोय करण्याचा घाट आरोग्य विभागाने घातला असल्याचे या प्रकारावरून समोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)