डॉक्टर, नर्स झोपेत असताना तरुणाचा तडफडून मृत्यू

सातारा : सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे एका बावीसवर्षीय तरुणाला आपला गमवावा लागला आहे. हा तरुण मृत्यूशी झुंज देत असताना डॉक्टर आणि परिचारिका मात्र गाढ झोपा काढत होते. तरुणाला तडफडताना पाहून नातेवाइकांनी परिचारिकांना झोपेतून उठवले आणि तरुणावर उपचार करण्यास सांगितले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टर आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळेच या तरुणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

साताऱ्याच्या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या बावीसवर्षीय विनायक बाळकेश्वर शिंगनाथ याला उलटी झाल्याने आणि पोटात दुखत होते. त्यामुळे शनिवारी दुपारी हा तरुण उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याला अ‍ॅडमिट व्हावे लागेल, असा सल्ला दिला. सिव्हिलमधील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये त्याला अ‍ॅडमिट करण्यात आले. सलाईन आणि इंजेक्शनद्वारे त्याच्यावर उपचार सुरू झाले. रुग्णालयात त्याच्यासोबत त्याचा भाऊ गणेश हा थांबला होता. इतर नातेवाईक घरी गेले होते.

दरम्यान, रविवारी रात्री अडीचच्या सुमारास अचानक पुन्हा विनायकच्या पोटात दुखू लागले आणि जुलाबही होऊ लागले. त्यावेळी वॉर्डमध्ये परिचारिका व डॉक्टर कोणीच नव्हते. वॉर्डच्या बाहेर एका खुर्चीवर कपाऊंडर डुलक्या घेत होता. विनायकचा भाऊ गणेशने त्याला झोपेतून उठवले. तोपर्यंत विनायकची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. परिचारिका व डॉक्टर दुसरीकडे गाढ झोपेत होते. त्यांना उठवण्यासाठी कंपाऊंडर गेला. त्यानंतर एका परिचारिकेने येऊन त्याला सलाईन लावले.

भावाची अवस्था पाहून भांबावून गेलेल्या गणेशने हा प्रकार घरच्यांना सांगितला. केवळ पाच मिनिटांतच सर्व नातेवाईक सिव्हिलमध्ये आले. परंतु गाढ झोपलेले परिचारिका आणि डॉक्टर आले नाहीत. नातेवाइकांनीच त्यांना झोपेतून उठवले. विनायकवर उपचार सुरू झाले; परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. उपचारापूर्वीच त्याचा अखेर मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.