बेतिया – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. बेड्स, ऑक्सिजन यांचा अभाव असल्याने अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळत नाही. या महामारीत सर्वसामान्य रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही या बातम्या रोजच ऐकायला मिळत आहेत.
परंतु जे डॉक्टर दिवसरात्र रुग्णांच्या सेवेत आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये ते ड्युटी करत आहे. त्याठिकाणीही डॉक्टरला बेड मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण पश्चिमी चंपाकरणच्या नरकिटयागंज परिसरातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राजीव पांडेय हे उपविभागीय हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्यांची ड्युटी आयसोलेशन वार्डात लावली होती. परंतु ४ मे रोजी तब्येत बिघडली. त्यांची चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. सोमवारी त्यांचे कुटुंबीय डॉ. राजीव यांना घेऊन रुग्णालयात पोहचले. परंतु तासभर कुटुंबीय भटकत राहिले पण कोणीही मदतीसाठी आलं नाही. त्यांना रुग्णालयात बेड उपलब्ध झाला नाही. माध्यम प्रतिनिधींनी याची दखल घेतली असता त्यांची पुन्हा कोविड चाचणी करण्यात आली,मात्र त्यांची चाचणी निगेटिव्ह अली. डॉ. राजीव सध्या होम आयशोलेशनमध्ये आहेत.
डॉक्टर राजीव कुमार पांडेय यांच्या पत्नी अनामिकाने सांगितले की, “माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर मी आणि माझे सासरे यांनी राजीवला रुग्णवाहिकेतून उपविभागीय हॉस्पिटलला आणलं. परंतु हॉस्पिटलमध्ये आमची विचारपूस करणारंही कोणी नव्हतं. आम्ही राजीवला इकडून तिकडे घेऊन भटकत राहिलो पण आम्हाला मदत मिळाली नाही.
तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये माझ्या पतीने ओव्हरटाईम केले, रुग्णांची सेवा केली आज त्यांना स्वत:ला कोविड चाचणी आणि उपचारासाठी भटकावं लागतंय. कोणीही आमचं ऐकणारा नाही असं त्यांच्या पत्नीने आरोप केला आहे. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरच्या मदतीला येत नाही पाहून खेद वाटतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली.”