पेद्दापल्ली – करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळे मृतदेह ट्रॅक्टरमधून नेण्यात आला. विशेष म्हणजे करोनाबाधित मृतदेह असल्यामुळे ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर चालवण्यास नकार दिल्याने स्वतः एका डॉक्टराने ट्रॅक्टर चालवून मृतदेह स्मशानभूमीत नेला. सोशल मीडियावर या घटनेचे छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली. ही घटना तेलंगणा राज्यातील पेद्दापल्ली या जिल्ह्यात घडली आहे.
एका 43 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर ऍम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने रुग्णालयाने पालिकेला पर्यायी ट्रॅक्टर उपलब्ध करण्यास सांगितले. ट्रॅक्टर घेऊन आलेल्या चालकाने ट्रॅक्टर रुग्णालयात आणले. मात्र करोनाबाधित मृतदेह घेऊन जाण्यास त्याने नकार दिला. तब्बल एका तासानंतर याबाबत काहीही निर्णय होऊ शकला नाही.
शेवटी रुग्णालयातील डॉ. श्रीराम यांनी पीपीई किट घालून स्वतः ट्रॅक्टर चालवून मृतदेह स्मशानभूमीत नेला. तसेच मृतदेहाचा अंत्यविधी होईपर्यंत तिथेच थांबले.
सुलतानाबाद येथील क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. श्रीराम यांना करोनासंबंधी अधिकारी नियुक्त केले आहे. त्यांच्या या चांगल्या कृतीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री ईटेला राजेंदर यांनीही या घटनेची माहिती घेऊन या डॉक्टरांचे कौतुक केले आहे.