पुणे : दहा लाखाच्या खंडणीसाठी मारहाण करून डॉक्टरचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार भेकराईनगर हडपसर येथील हरपळे क्लीनीकमध्ये घडला आहे. या डॉक्टरकडून आरोपींनी सात लाख रुपयांची रक्कमही उकळली . गर्भलिंग निदाण चाचणी केली नसतानाही ती केली असल्याचे धमकावत ब्लॅकमेलिंग करण्यात आले होते.
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोन महिला, नाना, प्रदिप फासगे आणी एका महिला आरोपीचा पती व अनोळखी दोन व्यक्ती अशा सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय.48,रा. चंद्रपार्क श्रद्धानगर कोंढवा, मुळ. फलटन, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार (दि.29 मे) शुक्रवार (31.मे) रविवार या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर शिंदे हे स्रीरोगतज्ञ आहेत. ते मागील तीन वर्षापासून ते हडपसर येथील हरपळे क्लीनीकमध्ये प्रॅक्टीस करतात. एका महिलेने त्यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधून वैद्यकीय तपासणीचे काम आहे असे सांगितले. याच कारणातून त्यांची खडी मशीन चौकात एकदा भेट देखील झाली होती. रविवारी ही महिला तपासणीसाठी रुग्णालयात आली. त्यावेळी तीने डॉक्टरांना मला मुलगा हवा असून, माझी गर्भलिंगनिदान चाचणी करा असे सांगितले. त्यावेळी शिंदे म्हणाले तुम्ही तर गरोदर नसताना देखील चाचणी करा असे कसे काय म्हणता?
महिलेला समजावत असतानाच तीने अचानक मोठ्याने आरडा-ओरडा सुरू केला. त्यावेळी महिलेच्या नवऱ्याने डॉक्टरांना केबीनध्ये येऊन पकडले. घाबरुण शिंदे त्याच्या तावडीतुन सुटका करत केबीन बाहेर आले असता, रुग्णालयाचे मुख्य शेटर बंद होते. त्याचवेळी तिघा अज्ञात व्यक्तींनी रुग्णलयात प्रवेश केला. त्यांनी तुम्ही डॉक्टर आहात गर्भलिंगनिदान चाचणी कशी करता ? असा जाब विचारला. त्यांनी पोलिस आहोत असे सांगत डॉक्टरला धमकावले. आमचे साहेब येईपर्यंत तुम्ही तुमच्या केबीनमध्ये गप बसा नाहीतर आरडाओरडा केला तर जीवे ठार मारेल अशी धमकीही दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे रूग्णालयाचा संचालक डॉ. हरपळे व फिर्यादी डॉ. शिंदे दोघेही घाबरले होते.
दरम्यान तपासणीसाठी आलेल्या महिलेने त्यांना हे प्रकरण जर मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर आरोपी महिला, तिचा नवरा व इतर तिघांनी डॉ. शिंदे यांना जबरदस्ती एका चारचाकी गाडीत बसविले. यावेळी डॉ. हरपळे देखील सोबत होते. त्यांना सासवड रोडच्या बाजूला असलेल्या एका कार्यालयात नेण्यात आले. बुलेटवरून आलेले तिघेजण देखील यावेळी तेथे आले होते. त्यातील प्रदिप फासगे नावाच्या एका व्यक्तीला हरपळे यांनी ओळखले. फासगे याने मध्यस्ती करत सात लाख रुपयांवर हा विषय मिटवीण्यास सांगितले. नाहीतर पोलिस बाहेर थांबले असून, केस केली तर तुम्हाला अटक होऊन तुमची बदनामी होईल अशी धमकी दिली. त्यानुसार भितीपोटी डॉ. शिंदे व हरपळे यांनी पैशाची जुळणी करून आरोपींच्या हवाली केले. यानंतर आरोपींनी धमकावत याची कुठे वाच्यता केली तर तुम्ही अडचणीत येताल असे सांगितले.
दरम्यान संबंधीत महिलेने हे प्रकरण बारामती येथील एका महिलेने केल्याचे डॉ.शिंदे यांना सांगितले. यापुर्वी देखील या महिलेने असेच कृत्य केले असल्यामुळे पुन्हा त्रास होईल म्हणून डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिली.