परंपरा मोडणार की जपणार?

दक्षिण मध्य मुंबई

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे. शिवसेनेची स्थापना झाली तो शिवाजी पार्कचा परिसर आणि मुख्य म्हणजे शिवसेना भवन या मतदारसंघात येते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण जिथे झाले ती चैत्यभूमीही याच मतदारसंघात आहे. तरीही या मतदारसंघात शिवसेनेला विजयासाठी संघर्ष करावा लागला आहे.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मुंबईतला अतिशय महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 1991 पासून शिवसेनेची ताकद वाढत आहे. अर्थात या मतदारसंघात सलग एकाच पक्षाच्या एकाच उमेदवाराला कधीच निवडून दिले गेले नाही. प्रत्येकवेळी वेगळा खासदार या मतदारसंघाने पाहिले आहे. 1977 मध्ये या मतदारसंघातून भाकपच्या अहिल्या रांगणेकर निवडून आल्या होत्या तर 1980 मध्ये प्रमिला दंडवते या निवडून आल्या होत्या.

1984 मध्ये कॉंग्रेसचे शरद दिघे, 1989 मध्ये शिवसेनेचे विद्याधर गोखले, 1991 मध्ये पुन्हा शरद दिघे, 1996मध्ये शिवसेनेचे नारायण आठवले, 1998 मध्ये आरपीआयचे रामदास आठवले, 1999 मध्ये शिवसेनेचेच मनोहर जोशी, 2004मध्ये कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड, 2009मध्ये पुन्हा गायकवाड आणि 2014मध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे असा या मतदारसंघाचा इतिहास रहिला आहे. त्यामुळे या वेळी या मतदारसंघात काय घडेल याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. 2014 च्या राहुल शेवाळे यांच्या विजयाचे श्रेय मोदी लाटेला देण्यात येते. त्यावेळी राहुल शेवाळे यांना जवळजवळ 50 टक्के मते मिळाली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शेवाळे साधे नगरसेवक होते. आणि खासदार म्हणून निवडून आले. त्यांची ही झेप लक्षणीय होतीच.

गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत आहे. त्यामागे शेवाळे यांची मेहनतही तितकीच आहे. शिवसेना या मतदारसंघाला आपला बालेकिल्ला मानते या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे 21 नगरसेवक आहेत आणि सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघात युतीचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेची ताकद चांगलीच वाढलेली आहे. 2017मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर आहे. शिवसेनेचे या भागातून 17 नगरसेवक निवडून आले आहेत. या नगरसेवकांची आणि खुद्द राहुल शेवाळे यांनी केलेल्या कामांमुळे इथे शिवसेनाच बाजी मारेल असे चित्र आहे.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात संमिश्र वस्ती आहे. या मतदारसंघात दादर- माहीमचा उच्च मध्यमवर्गीय सुशिक्षित मतदार वर्ग आहे तर धारावीत गरीब कष्टकरी मतदार आहे. चेंबूर-अणुशक्‍तीनगरमध्ये आरपीआयचा प्रभाव आहे. या भागातील आरपीआयची मते अर्थातच शिवसेनेलाच मिळतील. शिवाय नगरसेवक असताना राहुल शेवाळे यांनी अणुशक्‍तीनगरमध्ये आपल्या कामाचा प्रभाव दाखवला आहे.

कॉंग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड अनुभवी नेते आहेत. पण त्यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसमधूनच विरोध आहे. यावेळी तरुण उमेदवाराला संधी मिळावी असा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांचेही नाव सुचवण्यात आले होते. धारावी परिसरात त्यांचा प्रभाव आहे. धारावी विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल शेवाळे यांना चांगली टक्‍कर दिली असती असे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. पण त्याकडे लक्ष न देता कॉंग्रेस श्रेष्ठींनी एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे कॉंग्रेसमध्ये असंतोष आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे तर भाजपच्या वाटेवर आहेत. आणि याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. शीव म्हणजे सायन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचेच पारडे जड असल्याचे चित्र आहे.

कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि वादावर नियंत्रण ठेवण्यात गायकवाड यांना यश आले तर त्यांची स्थिती मजबूत होईल. धारावी आणि दादर-माहिम या भागात कॉंग्रेस कार्यकर्ते अतिशय नाराज आहेत. धारावीत वर्षा गायकवाड यांच्या नावाचा पुरस्कार कॉंग्रेस कार्यकर्ते करत असले तरी मतदारांना वर्षा गायकवाड यांच्याबद्दल नाराजी आहे. गायकवाड पिताकन्येला राजकीय फायदे किती काळ देत रहायचे असा सवाल येथील मतदार करत आहेत.

दादरमध्ये एकनाथ गायकवाड यांच्या उमेदवारीला डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उघड विरोध केला आहे. गायकवाड वयोवृद्ध असल्याने त्यांना उमेदवारी नको अशी भूमिका कॉंग्रेसमध्ये अनेकांनी घेतली. शिवाय चेंबूर-अणुशक्‍तीनगरमधील गुरूदास कामत यांची लॉबी एकनाथ गायकवाड यांच्या विरोधात आहे. या सगळ्याचा फटका गायकवाड यांना बसेल असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

2014 मध्ये मनसेचे आदित्य शिरोडकर निवडणूक रिंगणात होते. यावेळी मनसे निवडणूक लढवत नसल्यामुळे मनसेची मतेही शिवसेनेकडे वळतील असा अंदाज आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी रामदास आठवले इच्छुक होते. पण आता ते निवडणूक लढवत नसले तरी त्यांचे समर्थक युतीच्या बाजूने आहेत. त्यामुळेही शिवसेनेचे पारडे जड आहे. या मतदारसंघात मराठी मतांचे वर्चस्व आहे, त्याचाही फायदा शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.