सोशल मीडियावरून जामखेडमध्ये उडतोय आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा
जामखेड – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी रंगात आली आहे. भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या आता मंत्री पाहिजे की आमदार, असा प्रश्न मतदारांना विचारला जात आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपांचा धुराळाही सोशल मीडियावर चांगलाच उडत आहे.
पालकमंत्री राम शिंदे व राष्ट्रवादीचे रोहित पवार या दोन्ही उमेदवारांनी एकापाठोपाठ शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचा रंग भरल्याचे पहावयास मिळाले. मंत्री राम शिंदे यांनी 4 ऑक्टोबर रोजी, तर रोहित पवार यांनी 3 ऑक्टोबर रोजी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सध्या कॉंग्रेस-भाजपकडून सोशल मीडियावरून प्रचाराचे शीतयुद्ध पेटले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांविरोधात झडत आहेत. ‘मंत्री पाहिजे की आमदार पाहिजे,’ ‘रामभाऊ निवडून आले तर मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतील, दुसरा कोणी निवडून आला तर आमदार म्हणून विरोधी बाकावर बसावे लागेल,’ असा मेसेज भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल केला जात आहे.
2014 मध्ये तालुक्यातून शिंदे यांच्या विजयासाठी त्यांच्या सोबत असणारी आणि पडद्याआडून सूत्रे फिरवणारी मंडळी यंदा नाराज असल्याने परिस्थिती आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आहे, असे प्रथमदर्शनी जाणवते. कर्जत-जामखेड येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपतून राष्ट्रवादीत आलेले सूर्यकांत मोरे यासह प्रमुख नेत्यांनी मंत्री शिंदेंच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. एकंदरीत मतदारसंघात एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचा आमदार आल्यास विरोधी बाकावर बसावे लागेल, असा मेसेज भाजपकडून व्हायरल होत असून, शिंदे यांना मंत्री केल्यास थेट कर्जत-जामखेड तालुक्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
तालुक्याला दुष्काळी अनुदानातून, पीकविम्यातून वगळले, कुकडी प्रकल्पातून जामखेड तालुक्याला अत्यल्प पाणीसाठा असताना राजकीय महत्वाकांक्षेपोटी प्रकल्पातून नदी पात्रात पाणी न सोडल्याने मतदार संघातील आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप तालुक्यातून प्रामुख्याने केला जातोय. मागील काही दिवसांत तालुक्यात पवार यांनी विविध ठिकाणी मेळावे घेऊन जनसंपर्क वाढवला.
मतदारसंघात जलयुक्त शिवार, मतदारसंघातील रस्त्यांची कामे भाजपकडून प्रचाराचा मुद्दा केली जात आहेत. एकूणच एकमेकांवर करण्यात येत असलेल्या आरोपांचेही तितकेच तत्परतेने खंडन केले जात असल्याच प्रकार सोशल मीडियावरून होत आहे. मंत्री शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभा घेणार असल्याचा मेसेज भाजपकडून व्हायरल केला जातोय.
विविध व्हाट्स ऍप ग्रुप आणि फेसबुक अकौंटवरून कर्जत किंवा जामखेड तालुक्यांत मोदींची सभा होणार असल्याचे सांगितले जाते. भाजपतर्फे एकतर्फी मानल्या जात असलेल्या या निवडणुकीसाठी मोदींची सभा घ्यावी लागत असेल, याचा अर्थ मतदारसंघात भाजपने पवार यांचा धसका घेतला आहे, असा सोयीस्कर काढून या मुद्याला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केला जातोय. पराभव डोळ्यांपुढे दिसत असल्याने विरोधकांकडून याचा विपर्यास केला जातोय, असे भाजपकडून सांगितले जाते.