वॉशिंग्टन : सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये एखादा केलेल्या कामाचे श्रेय घेण्यामध्ये चढाओढ होत असली तरी समाजातील काही घटक असे आहेत ज्यांना या कामाचे श्रेय घेणे आवडत नाही. पण आता आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मते हा एक किरकोळ मानसिक आजार असून त्याला ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ या नावाने ओळखले जाते. जर तुम्ही खरोखरच एखादे काम केले असेल तर त्या कामाचे श्रेय तुम्ही घ्यायलाच हवे अन्यथा तुमच्या सामाजिक जीवनावर आणि करिअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो असे शास्त्रज्ञांनी सुचवले आहे.
अनेक विद्यार्थी किंवा संशोधक भरपूर मेहनत करून अभ्यास करत असतात पण त्यानंतर आपल्याला परीक्षेत तेवढे गुण मिळतील की नाही याबाबत त्यांना शंका असते. जर चांगले गुण मिळाले तर ते अनेक वेळा आपल्या अभ्यासाला आणि गुणवत्तेला त्याचे श्रेय देत नाहीत. तर हा एक योगायोग आहे असे मानतात आणि याच मनस्थितीचे वर्णन इम्पोस्टर सिंड्रोम असे केले आहे . व्यक्तिमध्ये भरपूर क्षमता आणि गुणवत्ता असूनही केलेल्या कामाचे श्रेय या गुणवत्तेमुळे मिळालेले नाही असे मानणे हे या सिंड्रोमचे महत्त्वाचे लक्षण आहे.
स्टारबक्स या प्रख्यात कंपनीचे सीईओ हॉवर्ड शूज किंवा अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना सुद्धा या सिंड्रोमने ग्रासले होते. जगात अनेक सेलिब्रिटीज कलाकार आणि व्यावसायिक यांच्यामध्ये सुद्धा हा सिंड्रोम आढळतो. आपल्यापेक्षा आपल्या सहकारांमध्ये जास्त गुणवत्ता आहे अशी भावना या सिंड्रोममध्ये तयार होऊ शकते. चांगल्या केलेल्या कामापेक्षा सुद्धा केलेल्या चुकांवर या व्यक्ती जास्त फोकस करतात, ज्यामुळे नकारात्मक भावना तयार होते.
आधुनिक काळामध्ये या प्रकारचा सिंड्रोम मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यानेच मानसशास्त्रज्ञांनी आता सामाजिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येकाला दररोज एक रोजनिशी ठेवण्याची सूचना केली आहे. दररोज आपण काय मिळवले याची नोंद या रोजनिशीत करावी आणि रात्री झोपताना ते पुन्हा एकदा वाचावे म्हणजे नकारात्मक भावना निघून जाईल, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे.