आग्रा – एकेकाळी मुघल साम्राज्याची राजधानी असणाऱ्या फतेहपूर सिक्री येथे येणाऱ्या पर्यटकांना आता इथल्या इतिहासाबरोबरच वास्तुकलेची विश्वासार्ह माहिती देण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी फतेहपूर सिक्री येथील टाकसाळीत तेसच अकबराच्या मकबऱ्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामार्फत टूरिस्ट इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्यात येत आहेत. सुमारे दोन ते अडीच महिन्यात दोन्ही ठिकाणची केंद्रे सुरू होतील.
मुघल सम्राट अकबराने फतेहपूर सिक्रीला राजधानी बनवले होते. सुमारे पंधरा वर्षे याठिकाणी मुघल साम्राज्याची राजधानी होती. हे ठिकाण आता आग्रा-जयपूर महामार्गावर असल्याने पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. याठिकाणी असणारी विविध स्मारके पाहिल्यानंतर पर्यटकांसोबत गाईड नसेल तर त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तरे त्यांना मिळत नाहीत. पर्यटकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी टुरिस्ट इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्यात येत आहेत.
टाकसाळीत आठ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या सेंटरमध्ये जुनी चित्रे, छायाचित्रे, नकाशे आणि मजकुराच्या माध्यमातून स्मारकाचा इतिहास, वास्तुकला याविषयी माहिती मिळेल. जोधाबाई पॅलेसमध्ये पर्यटकांना दाखवण्यात येणारा माहितीपटही या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. अशाच प्रकारचे टुरिस्ट इंटरप्रिटेशन सेंटर अकबराच्या मकबऱ्यातही तयार करण्यात येणार आहे.
टाकसाळीतील सेंटरमध्ये पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील…
* अकबराने फतेहपूर सिक्रीला राजधानी म्हणून का निवडले? यामागे राजकीय कारणे होती की धार्मिक?
* फतेहपूर सिक्रीला राजधानी बनवण्यापूर्वी याठिकाणची परिस्थिती काय होती?
* डोंगरावर वसलेल्या फतेहपूर सिक्रीमध्ये पाणी व्यवस्थापन यंत्रणा कशी अंमलात आणली गेली?
* स्मारकाच्या वास्तूकलेविषयी आणि स्थापत्यकलेविषयीची माहिती मिळेल.
* याठिकाणी 1999-2000 या कालावधीत झालेल्या उत्खननाची माहिती मिळेल.
* फतेहपूर सिक्रीतील अकबराची टाकसाळ त्या काळात प्रसिद्ध होती. त्याठिकाणी मुघलकालीन नाणी पाडली जायची. आता या
टाकसाळीच्या एका भागात पुरातत्व खात्याने संग्रहालय उभारले आहे.
* 1999-2000 मध्ये याठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात सापडलेले अवशेष या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.