लंडन : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पाडले. यानिमित्त जगभरातील अशा अनेक संसद भवनांची चर्चा सुरू झाली आहे. भारताचे नवीन संसद भवन आकर्षक आणि भव्य असले तरी जगातील सर्वात भव्य संसद भवन मात्र रोमानियाचे मानण्यात येते. फक्त दोन कोटी लोकसंख्या असलेल्या रोमानियाचे संसद भवन जगातील सर्वात मोठे आणि भव्य आहे हे भवन म्हणजे जगातील सर्वात मोठी प्रशासकीय इमारत मानण्यात येते.
ही इमारत एकूण 20 मजली असून त्यापैकी 12 मजले हे जमिनीच्या वर असून आठ मजले जमिनीच्या खाली आहेत. याशिवाय इमारतीमध्ये एक ॲटॉमिक बंकर ही आहे .अणूयुद्धाची परिस्थिती उद्भवल्यास या बंकरमध्ये महत्त्वाच्या लोकांना आश्रय घेणे शक्य होते.
ही जगातील सर्वात वजनदार इमारत मानण्यात येते त्यामुळे ही इमारत दरवर्षी सहा मिलिमीटरने खचते असे समोर आले आहे.
रोमानीयाचा हुकूमशहा निकोलाय सेनेस्कु याने आपला राजवाडा म्हणून या इमारतीच्या बांधकामाला प्रारंभ केला होता, पण 1989 मध्ये रोमानियात क्रांती होऊन डाव्या विचाराचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या राजवाड्याचे रूपांतर संसद भवनात करण्यात आले. रोमानीयाच्या या भव्य संसद भवना व्यतिरिक्त जर्मनी हंगेरी या देशांमधील संसद भवनही भव्यपणे उभारण्यात आली आहेत.
याशिवाय अमेरिकेचा राज्यकारभार ज्या ठिकाणी चालतो ती कॅपिटल हॉल ही वास्तू आहे. कॅपिटल हॉल हे संसद भवन तब्बल 223 वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. त्यामध्ये कालांतराने अनेक बदल करण्यात आले असले तरी जगातील सर्वात जुनी संसद इमारत म्हणून कॅपिटल हॉल कडे पाहिले जाते. फ्रान्स सरकारचा राज्यकारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या इमारतीलाही 300 वर्ष होऊन गेली आहेत.
पण पूर्वी तेथे राजघराण्यातील व्यक्ती वास्तव्य करत असत 1889 मध्ये या इमारतीचे सरकारीकरण करण्यात आल्याने ती सर्वात जुनी संसद इमारत मानण्यात येत नाही. जगातील या सर्व महत्त्वाच्या संसद भवन इमारतींच्या चर्चेमध्ये आता भारताच्या सेंट्रल विस्टा या आधुनिक आणि भव्य अशा संसद इमारतीची भर पडली आहे.