नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या आवारातील मुघल गार्डनचे नामकरण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत उद्यान असे करण्यात आले आहे. या उद्यानात ट्यूलिप आणि गुलाबाच्या फुलांच्या अनेक दुर्मिळ जाती उपलब्ध आहेत. अगदी काळ्या आणि निळ्या रंगाचे गुलाब देखील या ठिकाणी पाहायला मिळतात.
मुख्य उद्यानाचा भाग, टेरेस उद्यान, लॉंग उद्यान, परदा उद्यान आणि अर्धवर्तुळाकार उद्यान असे विविध भाग आहेत. हे उद्यान मुघल शैलीतील असल्याने याचे नाव मुघल गार्डन असे पडले होते. आता त्याचे नाव अमृत उद्यान करण्यात आले असले तरी या उद्यानाचा इतिहास काय आहे हे उद्यान केव्हा तयार करण्यात आले या उद्यानाचा विस्तार किती क्षेत्रावर आहे असे प्रश्न आपल्याला पडू शकतात.
अमृत गार्डनमध्ये ट्यूलिप फुलांच्या रोपांबरोबरच गुलाबांच्या विविध जातींची रोपे लावलेली आहेत. त्यामुळे जगातील सर्वोत्तम उद्यानांमध्ये या उद्यानाचा समावेश केला जातो. सर्वसामान्य नागरिकांना फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत हे उद्यान पाहण्यासाठी खुले असते. राष्ट्रपती भवनातील सुमारे 15 एकर जागेवर अमृत उद्यान विस्तारलेले आहे. हे उद्यान म्हणजे राष्ट्रपती भवनाचा मुकुटमणी मानले जाते. नवी दिल्लीची रचना करणाऱ्या सर एडविन ल्युटियन्स यांनी 1917 साली मुघल गार्डन म्हणजेच सध्या अमृत उद्यान नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विस्तीर्ण बागेचा आराखडा तयार केला.
1928 ते 1929 दरम्यान या उद्यानात विविध प्रकारच्या फुलांची रोपे लावण्यात आली. म्हणजेच अमृत उद्यान हे 95 वर्षाचे झाले आहे. या उद्यानांचा आराखडा ताजमहालच्या आसपास असलेली उद्याने आणि जम्मू कश्मीर मधील उद्यानांच्या आराखड्यावरून तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळेच हे उद्यान मुघल गार्डन म्हणून ओळखले जात होते. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे राष्ट्रपती भवनाच्या वास्तुशैलीमध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य वास्तु शैलींचा मिलाफ आढळतो. त्याच आधारावर अमृत उद्यानही साकारण्यात आले आहे. सर ल्युटीयन्स यांनी या ठिकाणी मुघल शैली आणि इंग्रजी फुलांच्या रोपांना एकत्र आणून एक सुंदर उद्यान साकारले.
राष्ट्रपतींच्या सचिवालयाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार ख्रिस्तोफर हसी यांनी द लाईफ ऑफ सर एडमिन ल्युटीयांस या पुस्तकात लिहिले आहे, की सर एडविन यांच्या पत्नीने असे लिहून ठेवले आहे, हे उद्यान एखाद्या नंदनवनापेक्षाही सुंदर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर अमृत उद्यान म्हणजे दुसरा स्वर्गच. सर ल्युटियन्स यांच्या पत्नीने पुढे म्हटले आहे, की या ठिकाणच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, उद्यानात विविध रंग आणि सुगंधाची रेलचेल अनुभवयास येते.
* अमृत उद्यानाची वैशिष्ट्ये
1) या उद्यानात 169 जातींची गुलाबाची अनेक झाडे आहेत यापैकी बहुतेक गुलाब हे फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत फुलांनी डवरलेले दिसतात.
2) या उद्यानातील विविध गुलाबांच्या जातींची नावे महान व्यक्तींच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये मदर तेरेसा, राजाराम मोहन रॉय, अब्राहम लिंकन, जॉन एफ केनेडी, जवाहर इत्यादी नावाचे गुलाब आहेत.
3) गुलाबा खेरीज या उद्यानात ट्यूलिप, झेंडू, जलकुंभी आणि विविध हंगामी फुलांची रोपे लावण्यात आलेली आहेत, त्यामुळे या उद्यानाचे सौंदर्य आणखीनच खुलते.
4) उद्यानात सुमारे 50 जातींचे अनेक वृक्ष आहेत तसेच काही ठिकाणी वेली देखील चढवण्यात आलेल्या आहेत. मौलश्री वृक्ष गोल्डन रेन ट्री, टॉर्च ट्री अशी विविध प्रकारची वृक्षराजी या ठिकाणी पाहायला मिळते.
5) या उद्यानाचे सौंदर्य आणि मोल आणखी वाढावे म्हणून प्रत्येक राष्ट्रपतींनी योगदान दिलेले आहे. उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे तात्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती भवनाच्या आवारात औषधी वनस्पतींचे उद्यान, वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या वनस्पतींचे उद्यान, संगीत उद्यान, बायोफ्युअल पार्क, पोषण उद्यान आदी उद्याने विकसित केली आहेत.
यावर्षी अमृत उद्यान हे 26 मार्च 2023 पर्यंत सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे उद्यानाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत असते 28 मार्च रोजी फक्त शेतकऱ्यांना आणि 29 मार्च रोजी फक्त दिव्यांग व्यक्तींना आणि 30 मार्च रोजी फक्त पोलीस आणि लष्करातील व्यक्तींना या उद्यानात प्रवेश दिला जाईल.