नवी दिल्ली – महिला क्रिकेटमध्ये लहान आकाराचे चेंडू वापरले जावेत, तसेच खेळपट्टी देखील 22 यार्डपेक्षा कमी असावी, अशी मागणी न्यूझीलंडच्या एका महिला क्रिकेटपटूने केली होती. त्यावर भारताच्या महिला संघातील प्रमुख गोलंदाज शिखा पांडेने टीका केली आहे. महिलांच्या क्रिकेटला बाळबोध समजता का, असा खडा सवाल तिने केला आहे.
न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सोफी डिवाइन व भारतीय क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीक्स यांच्यातील नेटचॅट ऐकल्यावर मला त्याचे आश्चर्य वाटले. महिला क्रिकेट काही बाळबोध आहे का, असले अनाकलनीय बदल करण्याची मागणी करत आहेत. प्रेक्षकांना महिला क्रिकेटकडे वळविण्यासाठी महिलांच्या क्रिकेट स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. तसेच आयपीएलच्या धर्तीवर महिलांचीही स्पर्धा खेळविली गेली पाहिजे. केवळ चेंडूचा आकार लहान करून किंवा खेळपट्टीची लांबी 22 यार्डपेक्षा कमी करून महिलांचे सामने रंगतदार होणार नाहीत, असा टोलाही तिने मारला.
ऑलिम्पिक स्पर्धेत 100 मीटरची शर्यत असते. त्यात महिला 80 मीटर धावल्या तर चालतील का, मग क्रिकेटमध्येच हे बदल करण्यात यावेत ही मागणी सातत्याने का केली जाते याचे अद्याप कोडे आहे, असेही तिने सांगितले.