कॉंग्रेसमधील गटबाजीचा फायदा “आप’ला?

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसाठी धोक्‍याची घंटा

वंदना बर्वे / नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनानंतर कॉंग्रेसमध्ये उफाळून आलेली गटबाजी आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे भाजपचीही झोप उडाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आप, भाजप आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. याचा थेट फायदा भाजपला मिळाला होता. आप आणि कॉंग्रेसमध्ये मतदानाचे विभाजण झाल्यामुळे भाजपचे सर्व सातही खासदार निवडून आले होते.

मात्र, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे अचानक निधन झाल्यामुळे राजकीय समीकरणावर मोठा परिणाम पडला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शीला दीक्षित यांच्या विरोधामुळेच आप-कॉंग्रेस आघाडी होवू शकली नव्हती. याचाच फायदा भाजपला झाला. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीत आप आणि कॉंग्रेस एकत्र येण्याची शक्‍यता आहे. आघाडी होवू नाही शकली तरी कॉंग्रेस कमजोर होत चालली आहे. याचा थेट फायदा आपला होण्याची शक्‍यता आहे.

मुळात, कॉंग्रेस आणि आपची व्होटबॅंक एकच आहे. यात झोपडपट्टी, अनधिकृत वस्त्या आणि अल्पसंख्यांकांच्या मतांचा समावेश आहे. या मतांवर दीक्षित यांचा चांगला प्रभाव होता. याच कारणामुळे लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस सातपैकी पाच जागांवर तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आली. 16 व्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. शिवाय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती, हे येथे उल्लेखनीय.
दिल्ली विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. 17 व्या लोकसभेच्या निकालाचा आधार घेतला तर विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा परफॉर्मस चांगला राहू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. परंतु, शीला दीक्षित यांच्या निधनामुळे परिस्थिती बदलली आहे. कॉंग्रेस कमजोर झाल्यामुळे आप पक्ष मजबूत होत आहे आणि हाच भाजपसाठी चिंतेचा विषय आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)