मुंबई – ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 353, 307, 332, 506(2), 143, 148, 149, 120 (ब)सह आव्हाडांसह सात जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणी आता आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्हाला काय करायचे ते करा, आता निकाराची लढाई आहे, हा माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे…’ अशी संतप्त भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
ऋता आव्हाड म्हणाल्या, “त्यांनी नताशाचं नाव घेतलं, माझ्या जावयाचं नाव घेतलं. अत्यंत खालच्या थराला जाऊन बोलायचं, कोण बाबाजी आहे, त्यांच्या पैशाच्या व्यवहाराबद्दल बोलले आहे. इतके सगळे पुरावे असताना कायद्याचे सो कॉल्ड लोक कुठे आहे, गुरुवारी रात्री सुद्धा मुंब्य्रात आमच्या पदाधिकाऱ्याला फोन केला, आव्हाडांचा नंबर आहे असं अशी धमकी दिली आहे, असं ऋता आव्हाड यांनी सांगितलं.
आव्हाड यांच्यासह कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची माहिती देणारी ठाणे पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपनंतर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांच्यावर ठाणे पालिका मुख्यालयाच्या गेटवरच मारहाण केल्याचा घटना घडली. या घटनेमुळे सध्या एकच खळबळ निर्माण झाली आहे.