‘सिरम’चा नागरी सन्मान करा; माजी उपमहापौर दीपक मानकर यांची मागणी

पुणे – अवघ्या जगाला मेटाकुटीला आणणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या पुणे शहरातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने ‘कोव्हीशिल्ड’ लशीच्या निमित्ताने मोठा आशेचा किरण दाखवला आहे. यामुळे आपल्या पुणे शहराचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ही बाब पुणेकर म्हणून सर्वांसाठीच अभिमानाची आणि अत्यानंद देणारी असून सिरम इन्स्टिट्यूटचा कृतज्ञता म्हणून पुणे महानगरपालिकेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करावा, अशी मागणी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी केली आहे.

‘सिरम’च्या नागरी सत्कारासंदर्भात मानकर यांनी पुणे महापालिकेला ठरवही दिला आहे. सिरम इन्स्टिट्यूटचा सन्मान करताना संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला आणि सीईओ आदर पुनावाला यांचा गौरव राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करावा, अशी मागणी या ठरवाद्वारे करण्यात आली आहे.

या सन्मान सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. अमोल कोल्हे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह महापालिका पदाधिकऱ्यांचा उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा, असेही मानकर यांनी या ठरवाद्वारे सुचवले आहे.

याबाबत माहिती देताना मानकर म्हणाले, ‘एकवेळ अशीही होती, ज्यावेळी पुणे शहरात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या होती. मात्र याच पुणे शहराने देशाला संजीवनी देणाऱ्या लशीची निर्मिती केली आहे. ही अभिमानाची आणि पुणेकरांची मान उंचावणारी बाब आहे. त्यामुळे लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा गौरव करणे पुणेकरांचे आद्यकर्तव्य आहे. आपण दिलेल्या ठरावाचा निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल, ही अपेक्षा आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.