तीन महिन्यांत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू : अजित पवार 

जामखेड  – भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यामुळे कर्जमाफी अडकली आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या विचाराचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला निवडून द्यावे. आमचे सरकार येताच तीन महिन्यांमध्ये सरसकट कर्जमाफी देऊन सर्व शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ पवार यांच्या उपस्थितीत खर्डा येथे जाहीर सभा झाली. त्यात ते बोलत होते. रोहित पवार, राजेंद्र फाळके, ऍड. कैलास शेवाळे, राजेंद्र गुंड, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, कॉंग्रेसचे रमेश आजबे, गजाजन फुटाणे, ज्योतीताई गोलेकार, नितीन धांडे, कर्जतचे बाळासाहेब साळुंके उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी व दहशत पसरवून दबाव आणला जात आहे. मात्र या दबावाला आम्ही घाबरणारे नाहीत. आरे ला कारे म्हणत आम्ही जशास तसे उत्तर देऊ. कारण आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत. विरोधक अठरा वर्षांपूर्वीचे म्हणजे 2001 चे पत्र दाखवून अजित पवारांनी कर्जत-जामखेडला पाणी देता येणार नाही, असे सांगितल्याचा अपप्रचार करत आहेत.

परंतु या पत्राला 18 वर्षे झाली आहेत आणि वनवास हा बारा वर्षांचा असतो, हे आपण समजून घ्या. यानंतरच्या काळामध्ये गोदावरी प्रकल्प सुरू झाला. कृष्णा-सीना स्थिरीकरण योजना राबवून पाणी दिलं गेलं, हे मात्र विरोधकांकडून बोललं जात नाही. मी खरे बोलणारा माणूस आहे आणि मी आज आपल्याला शब्द देतो आपल्या कर्जत-जामखेड साठी कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे असे देखील अजित पवार यांनी सांगितले.

या निवडणुकीत तरुणांचा उत्साह दिसून येत आहे. मुख्यमंत्री साहेब आपण शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटींची कर्जमाफी केली म्हणून सांगता. मग सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कशा? कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले की कांदा निर्यात बंद केली. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या वेळी त्यांच्याच पक्षाचा टी-शर्ट घालून शेतकरी आत्महत्या करत आहे. या पेक्षा महाराष्ट्रात दुसरी दुर्दैवी घटना कोणती, असेही पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, मतदारसंघात शेतकरी, मजूर व बेरोजगारांची मोठी अडचण आहे. माझे छोटे कुटुंब होते. मात्र कार्यकर्ते या कुटुंबात आल्यावर आता मोठे कुटुंब झाले आहे. गेल्या पाच वर्षांत राम शिंदे यांनी काय दिवे लावले हे त्यांनी आपल्या भाषणांतून सांगावे. पालकमंत्री साहेब तुम्ही ही निवडणूक सोपी सांगता, मग तुमच्या सभेसाठी मुख्यमंत्री का आणता? त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. माझी शिकार करण्याच्या नादात लोकच तुमची लोकशाहीच्या माध्यमातून गेम करणार आहेत, असेही पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.