ओमायक्रॉनचे बाधित वाढले, मनपा आरोग्य विभागाचे आवाहन
पुणे- करोनासदृश लक्षणे दिसल्यास त्वरित आरटी-पीसीआर टेस्ट करावी. त्यामुळे उपचाराला दिशा मिळते, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये “ओमायक्रॉन’च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाचीच लक्षणे असली तरी तीन-चार दिवसांत बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.
मात्र सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असतानाही अनेक डॉक्टर आरटी-पीसीआर टेस्ट न करण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसऱ्या लाटेमध्येही कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण मोठे होते.
घरात राहून काळजी न घेणे, कुटुंबियांच्या संपर्कात जास्त काळ आल्याने, तसेच कॉमन वस्तूंचा वापर यामुळे कुटुंबातील सदस्य बाधित होत होते. सध्याही तीच परिस्थिती असून, कोणतीही करोना सदृश्य लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित तपासण्या करून, विलगीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
ओमायक्रॉनच्या विषाणूचे वैशिष्ट्यच असे आहे की, याची लक्षणे जीवावर बेतणारी नसली तरी त्याचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आधी तपासणी करणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्यविभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, योग्य काळजी घेतल्यास संभाव्य धोके टाळता येतील, असेही आरोग्य विभागाने केले आहे.