मराठी भाषा संवर्धनाचा निधी संस्थांना नकोच

पालिकेच्या भाषा संवर्धन समितीचा निर्णय

पुणे – मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपक्रमांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावत करण्यात आलेला निधी कोणत्याही संस्थेस अर्थसहाय्य म्हणून देण्यात येऊ नये, असा निर्णय संवर्धन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. महापालिकेकडून मागील वर्षी एका उपक्रमासाठी एका संस्थेस हा निधी देण्यात आला होता. त्यावर समितीमधील काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासनाच्या धर्तीवर या समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अंतर्गत समितीसाठी प्रत्येक वर्षी उपक्रम महापालिका शाळा तसेच शहरात राबविले जातात. समितीमध्ये मराठी भाषेच्या अभ्यासकांसह, साहित्य, कला तसेच मराठीशी संबधित तज्ज्ञांचा समावेश आहे. तर या समितीचे अध्यक्ष महापौर आहेत. महापौरपदाचा पदभार घेतल्यानंतर मोहोळ यांनी या समितीची बैठक घेतली. या बैठकीत मराठी भाषा संवर्धनासाठी राबविण्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. तसेच या समितीच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या निधीचा जास्तीत जास्त वापर करून भाषा संवर्धनासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

समितीने घेतलेले प्रमुख निर्णय
शासन निर्मित प्रमाण लेखन नियमांची प्रत्येकी पाच पुस्तके पालिकेच्या प्रत्येक शाळेत देणे.
पालिका शाळांमध्ये शिक्षक मुलांसाठी शुद्धलेखन कार्यशाळा घेणे.
दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत पालिकाशाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांच्यासाठी वेगवेगळया स्पर्धा घेणे, पुस्तक प्रदर्शन भरवणे.
मराठी भाषा दिनानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेणे

Leave A Reply

Your email address will not be published.