“या’ कार्यालयात नियुक्‍ती “नको रे बाबा’

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा धसका
भावी अधिकारी “बिथरले’
पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची नवीन टीम आणण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. या कार्यालयातील भ्रष्ट कारभार आणि डोकेदुखीचा अनेकांनी धसकाच घेतला आहे. त्यामुळे या कार्यालयात “नियुक्ती नको रे बाबा’ असेच अधिकारी म्हणू लागले आहेत.

शालेय शिक्षण विभागात राज्यात पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे एक महत्त्वाचे कार्यालय आहे. या कार्यालयात पूर्वी नियुक्ती मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागायची. त्यात विशेष प्रयत्न करणारेच बाजी मारायचे, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी या कार्यालयाचा कायापालट करण्यासाठी धाडसी पावले टाकण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. जुन्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या लवकरच होणार आहेत.

कर्तव्यदक्ष आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांनाच येथे नियुक्‍त्या देण्यात येणार आहेत. या कार्यालयात एजंटाचा वाढता हस्तक्षेप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची करडी नजर, वादग्रस्त प्रकरणे, कामातील सततचे विविध प्रकारचे अडथळ्यांमुळे विनाकारण डोकेदुखी वाढवून घेण्यात अर्थच नाही. त्यामुळे “आम्हाला या कार्यालयात नियुक्ती नकोच’, असेही काही अधिकारी सांगत आहेत.

या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत
पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव बबन दहीफळे, पुणे जिल्हा परिषद निरंतर .शिक्षणाधिकारी हारुन आत्तार, शिक्षण आयुक्त कार्यालय प्रभारी शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक, प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालय प्रशासन अधिकारी शैलजा दराडे, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, पुणे महापालिका प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांच्यापैकीच कोणाची तरीया कार्यालयात वर्णी लागणार आहे. शासनाकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत आता उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.