‘सुब्रमण्यम स्वामी यांनी बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा स्वतःचे हसू’
मुंबई: भारतीय रूपया मजबूत करायचा असल्यास नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापा, असा अनोखा सल्ला भाजपचे नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी दिला आहे. राज्यसभेचे सदस्य असणाऱ्या स्वामी यांनी मंगळवारी रात्री मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये भाषण केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यावर जोरदार टीका केली असून भारतीय जनता पक्षाचे नेते, खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा स्वतःचे हसू करून घेतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे. जीवनावश्यक गोष्टींचा दर गगनाला भिडले आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारल अपयशी ठरले आहे. मात्र, असे असताना सुब्रमण्यम स्वामी यांनी बेताल वक्तव्य करून पुन्हा एकदा स्वतःचे हसू करून घेतले आहे. इंडोनेशियाच्या चलनावर भगवान गणेशाचे छायाचित्र आहे म्हणून भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी भारतानेही नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापावे, असे तर्कशून्य विधान त्यांनी केले असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
आधीच डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारी घसरण त्यात मोदी सरकारची चुकीची धोरणे, यामुळे होणारा तोटा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. आजच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला फक्त मोदी सरकार जबाबदार आहेत. सामाजिकदृष्ट्या गैरलागू मुद्द्यांकडे लक्ष वळवून वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार चुकीचे अर्थनियोजन करत आहेत. निदान अर्थवयवस्था सुधारण्याची समज नसेल तरी बेताल वक्तव्य करून निदान देशातील नागरिकांची चेष्टा तरी करू नये, असे शाब्दिक फटकारे राष्ट्रवादीने ओढले आहेत.