टोल माफीसाठी टोलवाटोलवी करू नका

दौंड तालुक्‍यातील नागरिकांचा पाटस येथील टोल प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

वरवंड- दोंड तालुक्‍यातील सर्व वाहनधारकांना टोल फी वसुलीतून सूट देवून ती माफ करण्यात यावी, अशी मागणी करीत तालुक्‍यातील नागरिक पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस (ता.दौंड) टोलनाक्‍यावर आज (दि.10) मोठ्या संख्येने एकत्र आले होते. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसोबत येथील नागरिकांची टोल प्रश्नावर बैठक लावण्यात यावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. पाटस परिसरातील ग्रामस्थांच्या मागण्यांचा गांभीर्याने दखल घेऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी टोलवाटोलवी केली तरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

दौंड तालुक्‍यातील मौजे पाटस,कानगांव, गार, बेटवाडी, गिरीम ,बिरोबावाडी, सोनवडी, वरवंड, कडेठाण, हातवळण ,कुसेगाक ,पडवी,देऊळगांवगाडा इत्यादी परिसरातील नागरिकांना बारामती शहर येथे शैक्षणिक,हॉस्पिटल , होलसेल बाजारपेठ,शासकिय कार्यालये , जिल्हा सत्र न्यायालय इत्यादी कामकाजासाठी जाण्या-येण्याकरिता पाटस येथील कि.मी.क्र.65 वरील टोल प्लाझा ओलांडून जावे लागते. टोल प्लाझा ते बारामती फाटा हे 500 मीटर आहे. अंतर केवळ 500 मीटर अंतरासाठी या सर्व गावांतील वाहन धारकांकडून 62.500 की मी. अंतराचा टोल वसुल केला जातो. वरील वेगवेगळ्या गावातील वाहनधारक हे केवळ 500 मीटर ते 1000 मीटर पर्यंतचाच महामार्गाच्या मुख्य रस्त्याचा वापर करतात. तरी सुध्दा बारामतीकडे जाणाच्या वाहनधारकांना एकूण 62.500 कि.मी.चां टोल भरावा लागतो हे अन्यायकारक व वाहनधारकांची पिळवणुक करणारे आहे. तसेच, रोटी हिंगणगाडा, वासुदे, पांढरेवाडी ,जिरेगांव, कौठडी, लाळगेवाडी, कुरकुंभ इत्यादी गावांच्या परिसरातील
वाहनधरकांना पाटस या गावात शैक्षणिक, दवाखाना, आठवडे बाजारहाट, डिझेल/पेट्रोल भरणे किंवा पुढे दौंड

या तालुक्‍याच्या ठिकाणी हॉस्पिटल, शासकिय कार्यालये इत्यादी ठिकाणी जाणे-येणे करीता तसेच पाटस येथे असलेला साखर कारखाना ,पाटस रेल्वेस्टेशन ,पाटबंधारे कार्यालय इत्यादी ठिकाणी कामकाजासाठी जाणे येणे करिता पाटस टोल प्लाझा ओलांडून जावे लागते .अशा वाहनधारकांकडून फक्त 500 ते 1000 मीटर मुख्य रस्त्याचा वापर केला जातो. मात्र अशा वाहनधारकांकडून एकूण 62.500 किलोमीटरचा टोल वसुल केला जातो.

नॅशनल हायवेच्या नोटिफिकेशन व करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे टोल प्लाझा परिसरातील 20 कि.मी. अंतराच्या आतील स्थानिक वाहनाधारकांना मासिक पास घेण्यास सांगितला जातो. परंतु, सदर मासिक पासची रक्कम भरुन मासिक पास घेवून सर्वच वाहने दैनंदिन या टोल प्लाझावरुन जा-ये करीत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना मासिक पासचा भुर्दंडही परवडत नाही.

करारामध्ये करावयाच्या सर्व्हीस रोडबाबत स्पष्ट उल्लेख असून मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूने 62.200 ते 65.300 पर्यंत चा सर्व्हिस रोड करण्याबाबत स्पष्ट तरतूद असतानाही सदरचा 2.100 किमी चा सर्व्हीस रोड ठेकेदाराने पूर्ण केलेला नाही . त्यामुळे सर्व्हीसरोडचा वापर या गावातील स्थानिक वाहनधारकांना करता येत नाही. तसेच करारनाम्यातील तरतूदी प्रमाणे मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूने संपुर्ण मुख्य रस्त्याला समांतर 110 कि.मी.च्या सर्व्हिसरोडची तरतूद असतानाही तो ठेकेदाराने स्थानिक वाहनधारकांना येण्या-जाण्यासाठी खुला न करता अडथळे उभारून, अडवून ठेवलेला आहे. व त्याचा स्थानिक वाहनधारकांना वापर करू न देता जबरदस्तीने या सर्व्हिसरोडवर अडथळे उभारुन जबरदरतीने टोल वसुली करीत आहेत.

करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे सर्विस रोडची कामे पुर्ण न करणे, जो सर्व्हिस रोड झालेला आहे, तो स्थानिक वाहनधारकांसाठी वापरण्या करीता खुला न ठेवता त्यावर अडथळे उभा करुन जाणीवपुर्वक अडवणुक करुन जबरदस्तीने टोल वसुली केली जात आहे.

टोल नाका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस हवालदार संतोष मदने, अन्सार शेख हे उपस्थित होते. हे निवेदन देण्यासाठी वसंत साळुंखे, डॉ. मधुकर आव्हाड, मनोज फडतरे, वसंत शितोळे, विश्वास अवचट, संजय शिंदे, प्रताप भागवत, गणेश चोरमले, साबीर तांबोळी, गोरख सुतार, अभिजित ढमाले यासह पाटस गावातील वाहन मालक – चालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टोल प्लाझाच्या दक्षिणबाजूस असलेल्या कि.मी.62 ते 65 दरम्यान असलेला सर्व्हीसरोड (सेवा रस्ता) स्थानिक वाहनधारक नागरिकांना जाण्या-येण्यासाठी खुला करुन देण्यात यावा. पाटस टोल प्लाझा येथे दौंड तालुक्‍यातील तालुक्‍यातील स्थानिक सुशिक्षीत बेरोजगार युवकांना नोकरीमध्ये समाविष्ट न करुन घेता, दौंड तालुक्‍या बाहेरील व्यक्तींना त्याठिकाणी कामास घेतले जाते. ही बाब दौंड तालुक्‍यातील बेरोजगार युवकांच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याने, पाटस टोल प्लाझा येथे दौंड तालुक्‍यातील स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्याने नोकरीत सामाविष्ट करुन घेण्यात यावे. या चार प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

  • आंदोलकांच्या प्रमुख मागण्या…
    पाटस टोल प्लाझा वरुन दोंड तालुक्‍यातील सर्व वाहनधारकांना टोल फी वसुलीतून सूट देवून ती माफ करण्यात यावी. करारातील तरतूदीप्रमाणे मुख्य रस्त्याच्या डाव्याबाजूचा कि.मी.63.200 ते 65.300 दरम्यानचा सर्व्हीसरोड व उजव्या बाजूच्या मुख्य रस्त्याला लागून असलेला समांतर सर्व्हीसरोड कि.मी.40 ते 144.400 पर्यंतचा संपुर्ण सर्व्हीस रोड (सेवा रस्ता) स्थानिक वाहनधरकांसाठी त्वरीत पुर्ण करुन जाणे-येणेसाठी खुला करुन देण्यात यावा.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)