नवी दिल्ली – काही अनधिकृत लोक विमा कंपन्यांचे एजंट असल्याचे भासवून वैद्यकीय उपचारात सवलती देणाऱ्या योजना देऊ, असे नागरिकांना सांगत आहेत. अशा व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन विमा नियंत्रकांनी जनतेला केले आहे.
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे आयआरडीएआय या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, उपचारातील सवलतीच्या विमा योजना देऊ करून जनतेला फसविण्याचा काही जण प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत.
आयआरडीएआयने मान्यता दिलेल्या विमा कंपन्यांचे एजंट फक्त अशी विमा उत्पादने विकू शकतात. त्यामुळे नागरिकांनी एजंटने सांगितलेली विमा कंपनी खरी आहे काय, एजंट खरा आहे का, याची खात्री करून व्यवहार करावेत. आयआरडीएआयच्या वेबसाइटवर अधिकृत विमा कंपन्यांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. जर विमा एजंट बनावट असल्याचे आढळले तर नागरिकांनी संबंधित विमा कंपनीकडे चौकशी करावी.
या अगोदर आयआरडीएआयचे कर्मचारी असल्याचे भासवून काहीजण विमा उत्पादने विकण्याचा प्रयत्न करीत होते. याची माहिती मिळाल्यानंतर आयआरडीएआयने अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. आयआरडीएआय ही काही विमा कंपनी नाही. त्यामुळे आमचे कर्मचारी विमा व्यवसाय करत नसतात, असे स्पष्टीकरण आयआरडीएआयने केले होते.