राजीनामा नकोच! राहुल गांधींची समजूत काढण्याचा शीला दीक्षित यांच्याकडून प्रयत्न

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमधील धक्कादायक पराभवानंतर पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे कंटाळलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसच्या कार्यकारणी समितीने नाकारला असून पक्षातील सर्वच जेष्ठ नेत्यांकडून सध्या त्यांचे मन वळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच आज दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राहुल गांधींना आपल्या राजीनाम्याच्या निर्णयापासून परावृत्त करणे हाच या भेटीमागील हेतू होता.

राहुल गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर शीला दीक्षित या भेटीबाबत माहिती देताना म्हणाल्या, “मी राहुल गांधींना त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये असा संदेश दिला आहे. आम्हाला काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी हेच हवे असून त्यांनी राजीनामा दिल्यास आम्हाला अतीव दुःख होईल असं मी त्यांना सांगून आले आहे.”

तत्पूर्वी, राहुल गांधी यांच्या तुघलक रोडवरील निवासस्थानी काल भगिनी प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, रणदीप सुर्जेवाला आणि के. सी. वेणुगोपाल राहुल गांधींची भेट घेतली होती मात्र या जेष्ठ नेत्यांच्या भेटीनंतरही ते आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान या भेटीआधी एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी संवाद साधताना काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या शिला दीक्षित यांनी, “राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत मात्र आम्ही त्यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारणार नाही. त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलं काम केलं आहे. राहिली गोष्ट लोकसभा निवडणुकांतील पराभवाची तर जय-पराजय हे आयुष्याचा भाग आहेत. आपण केवळ आपला लढा देत राहायचा असतो.” अशी भूमिका मांडली होती.

याच पार्श्वभूमीवर विविध प्रदेश समित्यांकडून राहुल गांधी यांचे समर्थन केले जात असून सर्वात आधी तेलंगणा प्रदेश र्कॉंग्रेस समितीने राहुल गांधी यांचे समर्थन करताना त्यांनीच पक्षाध्यक्षपदी राहिले पाहिजे अशी मागणी केली होती. केरळातील कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही राहुल गांधी यांचे समर्थन करताना म्हटले की, ‘पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी तेच एकमेव योग्य व्यक्ती आहेत. पक्षाला अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढण्याचे काम राहुल गांधी यांच्याखेरीज अन्य कोणीही करू शकत नाही.’

लोकसभा निवडणुकांतील धक्कादायक पराभवानंतर शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जेष्ठ नेते पी चिदंबरम यांच्यावर पक्ष कार्यापेक्षा लोकसभा निवडणुकांमध्ये उभा राहिलेल्या आपल्या मुलांच्या प्रचारात वेळ वाया घालवल्याचा आरोप लावला होता. यावेळी राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सादर करत कार्यकारणी समितीला काँग्रेस घराण्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान करावे असं देखील सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.