पुणे, – निवडणूक निकालानंतर शहरात कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नागारिकांनी अनधिकृतपणे बोर्ड, फ्लेक्स, बॅनर्स तसेच कोणत्याही प्रकारच्या जाहीराती लावू नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. शहरातील अनधिकृत जाहिरातींमुळे होत असलेल्या विद्रूपीकरणाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेस दि. १९ नोव्हेंबरला याबाबत आदेश दिले आहेत.
त्यानुसार, महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. मात्र, एका बाजूला महापालिकेकडून हे आदेश काढण्यात आलेले असताना निवडणूक मतदानानंतर अवघ्या काही तासांतच सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाहिरातफलक लागले असून महापालिकेकडून त्यावर साधी कारवाई करण्याचीही तसदी घेतलेली नाही. त्यामुळे एका बाजूला न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात असतानाच या आदेशाचे राजरोसपणे उल्लंघन होत असताना महापालिका प्रशासनमात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
कारवाईस टाळाटाळ…
शहरातील अनधिकृत जाहिरातींंबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून वारंवार आदेश दिलेले आहेत. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष केले जात आहे. आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून ही कारवाई अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांंना सोबत घेवून केली जात असली तरी प्रत्यक्षात या दोन्ही विभागाचे कर्मचारी कारवाई टाळाटाळ करीत असून अधिकाऱीही त्याला पाठबळ देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात केवळ आचारसंहितेच्या कालावधीत अनधिकृत जाहीराती थांबल्या होत्या. मात्र, मतदान संपताच शहरभर पुन्हा या जाहिराती लागल्या आहेत. तर, न्यायालयाने आदेश देवून ४८ तास उलटण्यापूर्वीच शहरात अनधिकृत जाहिराती लागण्यास सुरूवात झाली आहे.