वाघोली (पुणे) – पूर्वी महामार्गालगत असणारी दोन वाईन शॉप आव्हाळवाडी रस्ता येथे स्थलांतरित झाले आहेत. तर पुन्हा महामार्गालगत वाईन शॉप स्थलांतरित होत असल्याच्या हालचाली दिसू लागल्याने माहिती सेवा समितीच्यावतीने स्थलांतराला विरोध दर्शविण्यात आला आहे. या वाईन शॉपमुळे वाहतूक कोंडीत भर पडणार होती. तसेच रस्त्याने जाणाऱ्या महिलांना देखील त्रास होणार असल्यामुळे संबंधित विभागाला वाईन शॉप स्थलांतर करू नये, याबाबत माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी निवेदन दिले आहे.
पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथे पूर्वी दोन दारु दुकान सुरू होते. दुकाने रस्त्यालगत असल्याने दारू घेण्यासाठी नागरीक रस्त्यावर वाहने लावत होते. त्यामुळे त्याठिकाणी वाहतुककोंडी होत होती. त्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या महिलांना मद्यपींचा खुप त्रास होत होता. याबाबत तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दारु दुकाने आव्हाळवाडी रस्त्यावर स्थलांतरीत झाली.
पुन्हा दारु दुकाने त्याच जागेवर स्थलांतरित होत असल्याने ती दारु दुकान महामार्गालगत स्थलांतरित होण्यास विरोध दर्शविला आहे. ही दुकाने स्थलांतरित करताना कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. स्थलांतरासाठी ग्रामपंचायत ना हरकत दाखला, जागेचे बांधकाम अधिकृत असावे, जागा बिगरशेती किंवा गावठाणात असावी. यापैकी कोणतेही कागदपत्रे नसताना संबंधित अधिकाऱ्यांनी स्थलांतरित केले आहे. त्यामुळे ते परवाने रद्द होऊ शकतात व ज्या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून या दारु दुकानास स्थलांतराची परवानगी दिली. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. महामार्गालगत दारू दुकानांचे स्थलांतर झाल्यास पुन्हा नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागेल. महिलांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे दारू दुकान स्थलांतराची परवानगी देऊ नये अन्यथा माहिती सेवा समितीच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
<
blockquote>पूर्वीच्या वाईन शॉपची जागा गावठाणात नाही, बिगरशेती नाही, गावठाणात असल्याचा खोटा दाखला देणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई झाली आहे. दारु दुकान रस्त्यापासून 10 फुटावर असल्याने ते कायद्यात बसत नाही. त्यामुळे दारु दुकानास स्थलांतराची परवानगी देऊ नये. त्यांचे परवाने कायमचे रद्द करावेत.
– चंद्रकांत वारघडे, अध्यक्ष माहिती सेवा समिती.