तुमची निष्क्रियता जनतेला काढायला लावू नका

मनोज घोरपडे : पाच लाख निधी देऊन कार्यसम्राट होता येत नाही
सातारा  –
विद्यमान आमदार म्हणत आहेत अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी काय केले? आमदारांना एकच सांगतो मी सर्वसामान्य घरातील असून शून्यातून व कष्टातून उभा राहिलो आहे, तुमच्यासारखे सभासदांच्या जीवावर उभा राहिलेल्या सहकारी साखर कारखाना चालवत आयत्या पिठावर रेगुट्या मारल्या नाहीत, 9 महिन्यांत या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने साखर कारखाना उभा केला आहे.

तुम्ही साखर कारखाना सोडून नवीन कोणता उद्योग चालू केला ते सांगा? या जनतेला उगाचच निष्क्रियपणा काढायला लावू नका, अशी टीका मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांच्यावर केली. मसूर गटातील वडोली, धनकवडी, कवठे, खराडे, कालगाव, बेलवाडी, चिंचणी, पाडळी, बानुगडेवाडी, हेळगाव, गोसावेवाडी, कचरेवाडी, कोणेगाव या गावात पदयात्रा व कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

मनोज घोरपडे म्हणाले, 20 वर्षे सत्ता हातात असूनही मसूर विभागातील वाडी वस्तीवर जाण्यासाठी पक्के रस्ते तुम्ही तयार करू शकला नाही यासारखे मोठे दुर्दैव कोणते असेल, कालगाव सारख्या गावातील वस्तीवर आजही लोकांना दूषित प्यायला लागत आहे, सत्ताकेद्र घरात असूनही तुम्ही जनतेला पाणी, रस्ते व वीज यासारख्या मूलभूत सुविधा देऊ शकत नसाल तर तुम्हाला या पदावर राहण्याचा काहीएक अधिकार नाही, यापेक्षा वेगळी निष्क्रियता काय असू शकते? याचे उत्तर तुम्ही द्या. एकहाती असणाऱ्या सत्ता केंद्राचे विकेंद्रीकरण करण्याचे कराड उत्तरमधील जनतेने ठरवले आहे, त्यामुळे तुमचा पराभव हा काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे.

आज लोकांचा मिळणारा वाढता पाठिंबा तुम्हाला रूचत नसल्याने चालू केलेल्या दबावाला जनता भिक घालणार नाही, असे सडेतोड बोल मनोजदादा घोरपडे यांनी सुनावले. यावेळी मनोजदादांना कोणेगावचे माजी सैनिक विलास चव्हाण यांनी मदत म्हणून धनादेश दिला.

या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, राजेंद्र पाटील, युवा नेते विकासअण्णा गायकवाड, जयवंतराव जगदाळे, सुनिल दळवी, डॉ. शंकरराव पवार, नंदकुमार डुबल, सुरेश माने, लखन साळुंखे, बाळासाहेब कांबीरे, प्रकाश चव्हाण, अनिल संकपाळ, रमेश चव्हाण, अशोक मदने, राखी पवार, सुहासराव खांबे यांच्यासह विभागातील शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.