महापालिका-महावितरण आमने सामने
पिंपरी – महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत झाल्याची माहिती देणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा दावा महावितरण प्रशासनाने खोडून काढला आहे. महापालिकेकडून रावेत जलशुद्धीकरण केंद्रातील अंतर्गत विद्युतविषयक दुरुस्ती कामासाठी गुरुवारी (दि. 3) सुमारे आठ तास वीजपुरवठा बंद ठेवला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यासाठी महावितरण जबाबदार नाही, असे पत्रकच महावितरणच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
महापालिकेच्या रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शनिवारी व रविवारी (दि. 4 व 5) पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून समाजमाध्यमांद्वारे प्रसारीत झाल्याची बाब महावितरण प्रशासनाच्या निदर्शनास आली. मात्र याबाबतची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी महावितरण प्रशासनाने पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार रावेत जलउपसा केंद्राचा वाढीव वीजभाराचे काम करण्यासाठी महापालिकेकडून गुरुवारी (दि. 3) सकाळी दहा वाजता विद्युतविषयक काम सुरु करण्यात आले व सायंकाळी साडे सहा वाजता हे काम पूर्ण झाले.
या कालावधीत महापालिकेच्या मागणीनुसार महावितरणकडून जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या कालावधीत पंपिंग बंद होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. 4) रात्री 11 वाजता रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला होता. मात्र महावितरणने लगेचच तांत्रिक उपाययोजना करून 50 मिनिटांनी पर्यायी व्यवस्थेद्वारे या केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. हा 50 मिनिटांचा अपवाद वगळता महावितरणकडून रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासाठी जबाबदार नसल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
याबाबत महापालिकेच्या सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रावेत जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासंदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाशी चर्चा करण्यात आली होती. या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार महावितरणच्या फिडरला येणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार होता, ही बाब नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने तसा उल्लेख करण्यात आला होता. शुक्रवारी (दि. 4) महावितरणकडून याठिकाणचा वीजपुरवठा सुमारे तासभर खंडित झाला होता. याबाबत कोणती समस्या असल्यास, त्याची सोमवारी (दि. 7) माहिती घेतली जाईल, असे ते म्हणाले.