चुकीच्या माणसांच्या हाती देशाची सूत्रे देऊ नका- मुख्यमंत्री

 कर्जत येथील सभेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर साधला निशाना

कर्जत: कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार हे अनाचार, दुराचार व भ्रष्टाचार या त्रिसूत्रीच्या आधारे चालले. मात्र मोदी सरकारने तिजोरीतील पैसा गरिबांपर्यंत पोचवण्याचे काम केले. 98 टक्के घरांत शौचालये केली. शेतकऱ्यांना पुढील काळात पेन्शन दिले जाणार आहे. विरोधक मात्र सैनिकांच्या बाबतीतही प्रश्‍न निर्माण करीत आहेत. मतदारांनी अशा चुकीच्या माणसांच्या हाती देशाची सूत्रे देऊ नयेत. डॉ. सुजय विखे पाटील यांना संसदेत पाठवून भारत मातेच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कर्जत येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, माजी मंत्री सुरेश धस, बबनराव पाचपुते, राजेंद्र विखे पाटील, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, शांतिलाल कोपनर, नारायण मोरे, श्रीधर पवार, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, दादासाहेब सोनमाळी, बळीराम यादव, प्रसाद ढोकरीकर, पुष्पा शेळके, मनीषा सोनमाळी, मनीषा वडे, रवींद्र कोठारी, दीपक शहाणे, संजय भैलुमे, रामदास हजारे, अनिल गदादे आदी मंचावर उपस्थित होते.
खा. दिलीप गांधी म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान मोदी सरकारने जनतेपर्यंत कित्येक योजना पोहोचवल्या. त्यातून सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाला. लोक अपप्रचार करतात. मात्र मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम केले आणि काम करत राहणार आहे. त्यामुळे कोणी वेगळा विचार करू नये. यावेळी आ. सुरेश धस,नामदेव राऊत आदींची भाषणे झाली.

गेल्या पंधरा वर्षांत मतदारसंघातील जे प्रश्‍न सुटले नाहीत, ते पाच वर्षांत मार्गी लावले आहेत. दोन वर्षांत कर्जत तालुक्‍यातील टॅंकर बंद केले. जिल्ह्यातील टॅंकरची संख्या शंभराच्या खाली आणली. माळढोक, तुकाई चारी, पर्यटन, वीज, रस्ते असे प्रश्‍न मार्गी लावले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

विकेट पडेल म्हणून ते बसले घरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले, राष्ट्रवादीच्या साहेबांनी ओपनिंग बॅट्‌समन म्हणून तयारी केली. कॅप्टन म्हणून उतरले. मात्र विकेट पडेल, म्हणून घरी बसले. कॉंग्रेससोबत आघाडी करणारे पवार यांना कोणीतरी सांगा की, आता आपला देश चर्चा करणारा नाही, तर घरात घुसून मारणारा आहे, असेही टोला त्यांनी लगावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.