दुष्काळ निवारणासाठी पैसे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावेत
नगर – जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे. अशा परिस्थितीत सत्कार सोहळ्यासाठी कोणताही खर्च न करता कार्यकर्त्यांनी तो पैसा दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन निवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांचा कर्जतमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील पहिला सत्कार असल्याने हा सत्कार आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक आणि सर्वसामान्य मतदारांनी विश्वासाने दिलेल्या पाठबळामुळे लोकसभा निवडणुकीत झालेलल्या विजयाचा आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्या संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आवाहन आपल्या सर्वांसमोर आहे. या सर्व परिस्थितीत कार्यकत्यांकडून आयोजित केले जाणारे सत्कार सोहळे तसेच सत्कारासाठी होणारा खर्च टाळून टाळून तो पैसा दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा,’ असं आवाहन त्यांनी केलं.