बिल बनविले नाही म्हणून अभियंत्याला शिवीगाळ

सातारा पालिकेतील प्रकार; उपनगराध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर शांतता, कर्मचारी तणावात


यांची पाठराखण करणार कोण ?

पालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर प्रशासन प्रमुख या नात्याने मुख्याधिकाऱ्यांनी खंबीर भूमिका घ्यायला हवी. नतद्रष्टांना धडा शिकवायचा असेल तर पदाधिकाऱ्यांचीही प्रखर इच्छाशक्‍ती असायला हवी. पण टेंडर, टक्केवारी आणि पद याच्यापुढे काय असतं हे ना प्रशासन ना पदाधिकारी कोणालाच दिसेनासे झाले आहे.

रविवार पेठेतही फळकूटदादांचा जाच

पालिकेचा अतिक्रमण विभाग शहरातील धनदांडग्यांचा आणि गल्लीतील भुरट्यांचा जाच विनाकारण सोसतो आहे. कोणत्याही अतिक्रमणाला हात घालताच फळकूटदादांची दंडेलशाही किंवा मी वाड्यावर असतो, ही उद्दाम भाषा त्यामुळे अतिक्रमण मोहिमांचे गांभीर्य नष्ट झाले आहे. रविवार पेठेतील टिळक मेमोरिअल चर्चसमोरील जागेत रिक्षा थांब्यालगत एका भुरट्या दादाने बंद टपऱ्यांची माळ लावत रिक्षा थांबा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. शिवाय टपरीला हात लावशील तर खबरदार, असा दम पालिकेच्या शैलेश अष्टेकर यांना दिला. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे उखडण्याचे पक्के नियोजन पालिकेने केले आहे.

सातारा – सातारा पालिकेतील बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बिल बनवले नाही म्हणून शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार काही तरुणांनी केला. संबंधितांना छत्रीच्या लोखंडी बांबूने मारण्याचा प्रयत्न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पालिकेच्या नव्या प्रवेशद्वारासमोर घडली. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण फारसे हातघाईवर न येता मिटले. मात्र घडल्या प्रकाराने पालिकेचे कर्मचारी प्रचंड तणावात असल्याचे स्पष्ट झाले.

बांधकाम विभागाचे अभियंता शिंदे यांनी कात्रेवाडा शाळेच्या रंगरंगोटीचे बिल बनवले नाही, म्हणून मल्हार पेठेतील काही जण त्यांना शोधत सायंकाळी पाच वाजता पालिकेत आले होते. बिलाचा तांत्रिक तपशील मोठा असल्याने शिंदे यांनी ते बनवले नव्हते. मात्र ते त्यांनी जाणीवपूर्वक बनवले नसल्याच्या रागातून काही जण बांधकाम विभागात हुज्जत घालू लागले. शिंदे चहाला बाहेर गेल्याने त्यांचा शोध सुरू झाला.

पालिकेच्या नव्या प्रवेशद्वारासमोर शिंदे यांना अडवून युवकांनी बिल का बनवले नाही याचा जाब विचारला नाही. काही जणांनी मोठ्या छत्रीचे लोखंडी पाईप घेऊन चक्क त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांचे दुसरे सहकारी सुधीर चव्हाण यांनी त्यांना अडवत समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्या युवकांना समज दिली. घडल्या प्रकाराने शिंदे प्रचंड तणावात आले. या प्रकाराबाबत पालिका कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.