भीती न बाळगता अपघातग्रस्तांची मदत करावी

अमोल बालवडकर : “रस्त्यावरील अपघात-द्या मदतीचा हात’वर कार्यशाळा

औंध – “बऱ्याचवेळा अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्याची इच्छा असूनही मनात भीती असल्याकारणाने सामान्य माणूस त्यांच्या मदतीला जात नाही. अपघात झाला असल्यास न घाबरता त्या व्यक्तीस मदत करायला हवी,’ असे आवाहन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले.

महाराष्ट्र अस्थिरोग दिनानिमित्त बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशनतर्फे 1 मे रोजी बाणेर येथील पुणे महानगरपालिका बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित “रस्त्यावरील अपघात-द्या मदतीचा हात’ या विषयावर कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक बालवडकर तसेच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्करराव जाधव, लाइफ सेव्हिंग फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र पाठक उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्‌घाटन नगरसेवक बालवडकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी अपघातस्थळी तत्काळ उपाययोजना करण्याविषयी डॉ. राहुल शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून “अपघात झाला असल्यास मदतीस थांबणे, प्रथम अपघातस्थळाचा आढावा घेणे, मदतीसाठी 108 किंवा 100 नंबरला फोन करणे, अपघातग्रस्त व्यक्ती श्‍वास घेत असल्याची खात्री करणे, त्याचा श्‍वास सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, रक्‍त थांबवणे, दुखावलेल्या हाताला व पायाला आधार देणे तसेच अपघातग्रस्त व्यक्तीला एका कुशीवर झोपणे’, आदी उपयुक्त सूचना केल्या.

याप्रसंगी डॉ. सुषमा जाधव यांनी “सीपीआर’चे प्रात्यक्षिक दिले. तसेच, डॉ. अभिजित वाहेगावकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भास्करराव जाधव यांनी पोलीस प्रशासनासंबंधी नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करत “कायद्यानुसार अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीस धावून जाणाऱ्या व्यक्तीस स्वतःचे नाव व पत्ता सांगणे बंधनकारक नाही व साक्षीदार बनण्याची सक्ती नाही’, असे सांगितले.

स्वतःचे अनुभव सांगताना देवेंद्र पाठक म्हणाले, “अपघातग्रस्त व्यक्तीस केलेल्या मदतीमुळे त्या व्यक्तीस जीवदान मिळाल्यास स्वतःला आत्मिक समाधान मिळते’.

बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अमोल जमखंडे व डॉ. सारिका शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास बाणेर व बालेवाडी परिसरातील डॉक्‍टर तसेच नागरिक उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.